आर्थिक अरिष्टातील साखर उद्योगाला इथेनॉलचा ‘बूस्टर’
By राजाराम लोंढे | Published: July 25, 2022 02:25 PM2022-07-25T14:25:10+5:302022-07-25T14:26:04+5:30
बाजारपेठेची भूक ओळखून तेवढ्याच साखरेचे उत्पादन करुन उर्वरित इथेनॉलची निर्मिती करण्यास कारखान्यांनी सुरुवात केल्याने हा उद्योग सावरण्यास मदत होत आहे.
राजाराम लोंढे
कोल्हापूर : उसाचे वाढलेले क्षेत्र, त्यातून साखरेच्या उत्पादनात झालेल्या मोठ्या वाढीमुळे साखरेचे दर अस्थिर झाले होते. परिणामी सगळा साखर उद्योगच आर्थिक अरिष्टात सापडला होता. मात्र बाजारपेठेची भूक ओळखून तेवढ्याच साखरेचे उत्पादन करुन उर्वरित इथेनॉलची निर्मिती करण्यास कारखान्यांनी सुरुवात केल्याने हा उद्योग सावरण्यास मदत होत आहे.
आगामी साखर हंगामात जिल्ह्यात २५ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन होणार आहे. स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील साखरेच्या दरातील अस्थिरतेमुळे साखर उद्योग अडचणीत आला. अडचणीत येण्यात हे जरी कारण असले तरी काही कारखान्यांमधील गैर व्यवस्थापन ही तितकेच कारणीभूत ठरले. हंगाम २०१५ पासून कारखाने अधिक अरिष्टात सापडत गेले.
उसाची एफआरपी देण्यासाठी या कालावधीत तीन ते चार वेळा कारखान्यांना कर्जे घ्यावी लागली. साखरेचे आयात, निर्यात धोरणाचा फटका बसल्याने साखरेचे दर घसरत गेले. केंद्र सरकारने साखरेचा किमान हमीभाव निश्चित केला, मात्र एकीकडे एफआरपी वाढत असताना दुसऱ्या बाजूला त्या पटीत साखरेचे दर वाढले नाहीत, हेही वस्तुस्थिती आहे.
इथेनॉल, निर्यात धोरणामुळे साखर स्थिर
इथेनॉल निर्मिती केल्यामुळे साखरेचे उत्पादन कमी झाले, त्यात निर्यात धोरणामुळे गेल्या वर्षभर साखरेचे दर स्थिर राहिले आहेत. घाऊक बाजारात प्रति क्विंटल ३१०० ते ३२५० रुपयांपर्यंत साखर राहिली असली तरी किरकोळ बाजारात ३८०० पर्यंत आहे.
हे कारखाने करतात इथेनॉल निर्मिती
दत्त-शिरोळ, गुरुदत्त-टाकळीवाडी, वारणा, दालमिया, शाहू, सदाशिवराव मंडलीक, संताजी घोरपडे, पंचगंगा, उदयसिंगराव गायकवाड.
‘कुंभी’, ’बिद्री’चा प्रकल्प प्रस्तावित
बिद्री (ता. कागल) येथील दुधगंगा वेदगंगा व कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी कासारी कारखान्यांचे इथेनॉल प्रकल्प प्रस्तावित आहेत. येत्या वर्षभरात ते चालू होणार असल्याने जिल्ह्यात इथेनॉलचे उत्पादन वाढणार आहे.
गेल्या पाच-सहा वर्षात साखर उद्याेग कधी नव्हे इतका अडचणीत आला. आता बाजारपेठेच्या गरजेनुसार साखर उत्पादन, इथेनॉल निर्मिती व निर्यात या त्रिसुत्रीमुळे साखर उद्योग हळूहळू बाहेर पडण्यास मदत होईल. - विजय औताडे (साखर उद्योगातील तज्ज्ञ)