कारखान्यांनी लिहून घेतलेली संमतीपत्रे अमान्यच : ‘एफआरपी’ वेळेत द्यावीच लागेल-- सौरव राव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 02:01 PM2020-02-12T14:01:47+5:302020-02-12T14:03:47+5:30
शेतकरी कारखान्यांकडे ज्यावेळी उसाची नोंद देतात, त्यावेळी करारनाम्यात बेकायदेशीर अट टाकली जाते. दोन टप्प्यांत एफआरपी द्या, याबाबत कोठेही तक्रार करणार नाही, व्याजही मागणार नाही, असे लिहून घेतले जाते.
कोल्हापूर : ‘एफआरपी’ दोन टप्प्यांत देण्याबाबत साखर कारखान्यांनी ऊसनोंद करारात घेतलेली संमतीपत्रे अमान्य असून, शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ वेळेत द्यावीच लागेल. जे देणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करू, असा इशारा साखर आयुक्त सौरभ राव यांनी दिला.
संमतीपत्राच्या आडून साखर कारखानदार शेतकऱ्यांची आडवणूक करीत असल्याबाबत सोमवारी (दि. १०) आंदोलन अंकुश, जय शिवराय व बळिराजा शेतकरी संघटना यांच्या वतीने साखर आयुक्त राव यांची भेट घेतली. शेतकरी कारखान्यांकडे ज्यावेळी उसाची नोंद देतात, त्यावेळी करारनाम्यात बेकायदेशीर अट टाकली जाते. दोन टप्प्यांत एफआरपी द्या, याबाबत कोठेही तक्रार करणार नाही, व्याजही मागणार नाही, असे लिहून घेतले जाते. याबाबत शेतकरी अनभिज्ञ राहतो. मात्र संमतीपत्राचा आधार घेऊन साखर कारखाने एफआरपीप्रमाणे उसाचे पैसे देण्यासाठी शेतकºयांची अडवणूक करीत आहेत.
कारखान्याकडे पैसे उपलब्ध होतील त्यावेळी देऊ, अशी भूमिका घेतल्याने शेतकरी अडचणीत सापडल्याचे संघटनांनी निदर्शनास आणून दिले. यावर अशा प्रकारची अडवणूक पूर्णपणे चुकीची असून कायद्याप्रमाणे चौदा दिवसांत शेतकºयांना पैसे देणे बंधनकारक आहे. विहीत वेळेत एफआरपी न दिल्यास १५ टक्क्यांप्रमाणे व्याज द्यावे लागेल, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.
यावेळी ‘आंदोलन अंकुश’चे धनाजी चुडमुंगे, जय शिवराय संघटनेचे शिवाजी माने, ‘बळिराजा’ संघटनेचे बी. जी. पाटील, राकेश जगदाळे, आदी उपस्थित होते.
अवास्तव नोकरभरतीला चाप लावणार
अवास्तव नोकरभरती केल्याने साखर कारखाने अडचणीत आले आहेत. त्याचा परिणाम शेतक-यांना एफआरपी देण्यावर होतो; त्यामुळे अशा प्रकारच्या भरतीला चाप लावणार असल्याचे आयुक्त राव यांनी सांगितले.