जिल्ह्यात बनावट खतांचा सुळसुळाट
By admin | Published: November 18, 2016 12:45 AM2016-11-18T00:45:12+5:302016-11-18T00:45:12+5:30
बियाणासह खते जप्त : शंभरांवर विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा, तेरा गुणनियंत्रण पथके तैनात
आयुब मुल्ला -- खोची --जिल्ह्यातील रासायनिक खतांची बोगसगिरी वाढल्याचे पाहणीत निष्पन्न झाले आहे. बियाणेसुद्धा संख्येने जास्त अपात्र झाले आहेत. त्यांच्यासंदर्भात गुणनियंत्रण पथकाने कडक कारवाई केली आहे. शेतकऱ्यांच्या हाती बोगस बियाणे देण्याबरोबरच खतांचाही काळाबाजार करण्याचा प्रकार प्रकर्षाने पुढे आला आहे. खते, बियाणे, औषधे विक्री करणारे जवळपास शंभर नमुने अपात्र ठरले आहेत. त्यामुळे शंभरांवर विक्रेत्यांवर कायदेशीर संकट उभारले आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गुणवत्तानिविष्ठा म्हणजे खते, बियाणे, औषधे, सूक्ष्म मूलद्रव्य मिळण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभाग व राज्य शासन कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे गुणनियंत्रण पथक कार्यरत असते. चालूवर्षी या पथकाला तपासणीच्या कालावधीत अनेक धक्कादायक अनुभव आले आहेत. ५५३ बियाणांचे, २७९ खतांचे, ११0 औषधांचे नमुने तपासणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
एप्रिलपासून तपासणीचे काम सुरू आहे. या कालावधीत जवळपास ८0 टक्के तपासणी करण्यात आली. डिसेंबरपर्यंत उर्वरित तपासणी होणार आहे. ज्यांचे नमुने तपासणीसाठी घेतले त्यामध्ये अपात्र असणारी संख्या मोठ्या प्रमाणात आढळून आली आहे. विविध प्रकारच्या बियाणे कंपन्यांची रेलचेल आहे. यामध्ये विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी केली असता पाच प्रकारचे बियाणे नापास असल्याचे सिद्ध झाले आहे. यापैकी दोन कोर्ट केसेससाठी पात्र झाले आहेत.
तीन विक्रेत्यांना ताकीद देण्यात आली आहे. रासायनिक खतांमध्ये मात्र बोगसगिरीचा सुळसुळाट असल्याचे निष्पन्न झाले आहे. १५९ दुकानांतील खतांचे नमुने तपासले. त्यामध्ये ४४ कोर्टकेससाठी पात्र झाले आहेत. १५ खतविक्रेत्यांना सक्त ताकीद दिली आहे. औषधांच्याबाबत दोन कोर्ट केसेसाठी पात्र ठरले आहेत. आजअखेर ३१ बियाणे विक्रेत्यांवर बंदी घालण्यात आली. ११.२ मेट्रिक टन रासायनिक खते जप्त केली आहेत. सुपर फॉस्फेट, दुय्यम अन्नद्रव्य घटक ९२ हजार रुपयांचे जप्त केले आहेत. त्यामुळे निविष्ठा प्रकारातील खतांची बाब गंभीर आहे. बियाण्यांच्या बाबतीतही सतर्क राहणे गरजेचे
आहे. हे स्पष्ट झाले. अशी गुणनियंत्रण पथके तेरा आहेत.
जिल्हा पातळीवरील एक व बारा तालुक्यात प्रत्येक ी एक हे पथक कार्यरत आहे.
बोगसगिरांवर गुन्हा
खत व त्यावरील पिशवी बोगस तयार करुन एका कंपनीच्या नावाखाली विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अशा बोगसगिरांवर गुन्हा नोंद नुकताच झाला आहे.
गुणनियंत्रण पथक अत्यंत पारदर्शीपणे तपासणी करीत आहे. त्यामुळे बोगसगिरी बियाणे नापास होण्याचे प्रमाण आढळले आहे. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, बोगसगिरीला आळा बसावा यासाठी कडक कारवाई करण्यात येत आहे. - सुरेश मगदूम,
कृषी उपसंचालक, कोल्हापूर.