दिवाळीपूर्वीच कारखाने बंद पडण्याची स्थिती

By admin | Published: October 26, 2015 08:51 PM2015-10-26T20:51:06+5:302015-10-27T00:22:55+5:30

वस्त्रोद्योगावर मंदीचे सावट : सर्वच उद्योगांच्या उत्पादनात घट; आर्थिक टंचाईने व्यापारी, उद्योजक बेजार

Factory shut down before Diwali | दिवाळीपूर्वीच कारखाने बंद पडण्याची स्थिती

दिवाळीपूर्वीच कारखाने बंद पडण्याची स्थिती

Next

राजाराम पाटील -इचलकरंजी -येथील वस्त्रोद्योगावर मंदीचे कमालीचे सावट असून, मोठ्या प्रमाणावर आर्थिक टंचाई भासत आहे. आॅटोलूम, यंत्रमाग, सायझिंग, प्रोसेसिंग अशा सर्वच घटकांतील उत्पादनात तीस ते चाळीस टक्क्यांनी घट झाली. परिणामी दीपावलीपूर्वीच कारखाने बंद होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.गतवर्षीपासूनच वस्त्रोद्योगात मंदी आहे. मात्र, केंद्रात आणि राज्यात बदललेल्या सरकारांमुळे वस्त्रोद्योगास पुन्हा चांगले दिवस येतील, अशी आशा व्यापारी व उद्योजकांना होती. मात्र, जागतिक मंदीचे सावट अधिकच गडद झाल्याने वस्त्रोद्योगातील स्थितीत सुधारणा झाली नाही. अशातच सरकारने टफ्स, प्रोत्साहनपर पॅकेज, वीजदराची सवलत, असे अनुदान बंद केल्याने वस्त्रोद्योगामधील सूतगिरण्या, सायझिंग, यंत्रमाग, प्रोसेसिंग, गारमेंट असे सर्वच
घटक कमालीचे अडचणीत आले आहेत. महाराष्ट्रात तर देशातील
५० टक्के यंत्रमाग असल्याने
येथे आर्थिक मंदी अधिकच भासत आहे.
वस्त्रोद्योगात गेले वर्षभर मंदी असली तरी इचलकरंजीत मात्र कामगारांच्या वेतनावरून आंदोलने होत राहिली. गतवर्षी यंत्रमाग कामगारांच्या किमान वेतनाबाबत दाखल झालेल्या उच्च न्यायालयातील याचिकेवर सुनावणी सुरू असताना २९ जानेवारी २०१५ रोजी शासनाने सुधारित किमान वेतन जाहीर केले. किमान वेतनात यंत्रमाग कामगाराला महिन्याला किमान दहा हजार ५०० रुपये वेतन मिळाले पाहिजे, असे शासनाचे निर्देश होते. मात्र, हे वेतन अन्य राज्यांच्या तुलनेत अधिक असून, ते टाईम रेटवर असल्यामुळे परवडणारे नाही. म्हणून पॉवरलूम असोसिएशन व सायझिंग असोसिएशन या दोन्ही संघटनांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
किमान वेतनाच्या याचिकेवर सुनावणीबाबत तारखा पडत असतानाच इकडे त्याच्या अंमलबजावणीसाठी यंत्रमाग कामगार संघटनांच्या राज्यव्यापी संयुक्त कृती समितीने संबंधित यंत्रमाग केंद्रांमधून आंदोलने सुरू केली. मात्र, या आंदोलनाला सरकार व मालक संघटनांकडून योग्य असा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे टप्प्याटप्प्यांने आंदोलने सुरूच ठेवण्याचा निर्णय संयुक्त कृती समितीने घेतला. अशा स्थितीत इचलकरंजीतील सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेने २१ जुलैपासून बेमुदत संप सुरू केला. ५२ दिवस संप चालला तरीसुद्धा विविध पातळींवर बैठका होऊन निर्णय झाला नाही. अखेर निर्णयाविनाच (५०० रुपयांची वाढ घेऊन) सायझिंग कारखाने सुरू झाले. मात्र,
सायझिंग कारखान्यांच्या संपामुळे इचलकरंजीतील यंत्रमाग उद्योगात कापड उत्पादन कमालीचे घटले आणि त्याचा फटका येथील उद्योजक
व व्यापाऱ्यांना बसला. या काळात सुमारे ४५०० कोटी रुपयांचे कापड उत्पादन ठप्प झाले. अशा स्थितीत
दसरा संपला, तरी वस्त्रोद्योगातील
मंदीचे वातावरण सुरूच राहिले
आहे.



सर्वच घटकांसमोर अडचणी
वस्त्रोद्योगातील मंदीमुळे किमान १४ पैसे प्रतिमीटर जॉब रेट मिळाला पाहिज, असे असतानाही सध्या आॅटोलूम कारखानदारांना दहा पैसे जॉब रेट मिळतो आहे. यंत्रमाग कापडालाही मागणी नसल्याने कापड उत्पादनात सुमारे तीस टक्क्यांची घट झाली आहे. अशा स्थितीमुळे सायझिंग कारखान्यांसमोरही बिम उत्पादनाचा पोग्रॅम नाही, तर कापडावर प्रक्रिया करणाऱ्या प्रोसेसिंग उद्योगाकडेसुद्धा यंत्रमाग कापड येत नसल्याने दिवाळी सणाच्या निमित्ताने पुढील नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कारखाने बंद करण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

Web Title: Factory shut down before Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.