कारखानदारांत होणार उसासाठी मारामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2016 12:36 AM2016-07-21T00:36:03+5:302016-07-21T01:00:19+5:30
विभागात ४० लाख टन ऊस घटणार : दुष्काळ, अतिवृष्टीमुळे कोल्हापुरात सर्वाधिक फटका
राजाराम लोंढे -- कोल्हापूर--दुष्काळ, अतिवृष्टीमुळे यंदा कोल्हापूर विभागातील उसाचे उत्पादन किमान ४० लाख टनांनी घटण्याची शक्यता असून, ऊस मिळवून हंगाम यशस्वी करण्यासाठी साखर कारखानदारांमध्ये मारामारी होणार, हे नक्की आहे. कमी ऊस उत्पादनाचा फटका कोल्हापूर जिल्ह्यात बसणार असून, गेल्या दहा वर्षांतील नीचांकी गाळप होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. कधी नव्हे ती दुष्काळाची झळ यंदा कोल्हापूर जिल्ह्याला बसली. जानेवारीपासूनच पाटबंधारे विभागाने पाणीकपातीचे धोरण अवलंबल्याने ऊसपिकाला झटका बसला. कागल, राधानगरी, भुदरगड, करवीर, हातकणंगले, शिरोळ या तालुक्यांतील ऊस पाण्याअभावी अक्षरश: करपून गेला. कसाबसा उभा ऊस तोडून कारखान्याला पाठविल्यानंतर हताश होऊन ऊस काढला आहे. सर्वाधिक उसाचे क्षेत्र या सहा तालुक्यांत असल्याने त्याचा परिणाम आगामी गळीत हंगामावर होणार आहे. दुष्काळातून काहीशा वाचलेल्या उसाला अतिवृष्टीचा फटका बसला. विशेषत: नदीकाठचा ऊस पुराच्या पाण्याखाली गेल्याने त्याच्या उत्पादनात घट येणार आहे.
गतहंगामात कोल्हापूर जिल्ह्णात १ कोटी ४६ लाख ४ हजार टन, तर सांगली जिल्ह्णात ८० लाख १ हजार टन असे विभागात २ कोटी २६ लाख ९५ हजार टनांचे गाळप झाले होते. कारखान्यांचा हंगाम सहा महिने पूर्ण क्षमतेने चालला होता; पण आगामी हंगामात कारखानदारांची दमछाक होणार, हे नक्की आहे. कोल्हापूर जिल्ह्णातील सध्याचे उसाचे क्षेत्र पाहिले तर लागण ७१ हजार ३५३ हेक्टर, तर खोडवा ६१ हजार २७८ असे १ लाख ३२ हजार ६३१ हेक्टर उसाचे क्षेत्र आहे. जिल्ह्णाचा सरासरी उसाचा उतारा हेक्टरी ७९ टन गृहीत धरला तर १ कोटी ४ लाख ७७ हजार गाळप होण्याची शक्यता आहे. सध्या सांगली जिल्ह्णात ७२ हजार ३५८ हेक्टरवर ऊस आहे. येथील उसाचा सरासरी उतारा ८० टन गृहीत धरला तर ५१ लाख ८८ हजार टन गाळप होईल, असे अपेक्षित आहे. याशिवाय दोन्ही जिल्ह्णांतील कारखान्यांना परजिल्ह्णांतून २५ लाख टन ऊस गाळपास येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गतहंगामाची तुलना करता, किमान ४० लाख टन ऊस कारखान्यांना कमी पडण्याचा अंदाज आहे. सर्वच कारखान्यांच्या शेती विभागाला ऊस उपलब्ध करण्यासाठी आतापासूनच कंबर कसावी लागणार आहे.