संचालकांंकडून कारखान्याची लूट--भोगावती साखर कारखाना
By admin | Published: August 29, 2014 12:00 AM2014-08-29T00:00:23+5:302014-08-29T00:07:49+5:30
उदयसिंह पाटील-कौलवकर, सदाशिव चरापले यांचा आरोप
भोगावती : ‘भोगावती’च्या संचालक मंडळाने ताळेबंदात हातचलाखी करून को-जनरेशन प्रकल्पासाठी बॅँक कर्ज उपलब्ध करून घेण्याचा सोईस्कर मार्ग शोधला असून, व्यापाऱ्यांशी हातमिळवणी करून कारखान्याची लूट चालविली आहे, असा घणाघाती आरोप उदयसिंह पाटील-कौलवकर आणि माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले यांनी पत्रकार बैठकीत केला आहे.
पाटील आणि चरापले म्हणाले, या संचालक मंडळाने सत्तेवर येताना १११ कोटींचे कर्ज असल्याची श्वेतपत्रिका काढून जाहीर केले होते. सध्या ते कर्ज आम्ही फेडले असल्याचे सांगितले जात आहे; मात्र खऱ्या कारभाऱ्यांनी १०० कोटींचे कर्ज केले, असा आरोप केला आहे. तोडणी-ओढणी कामगारांच्या नावावर बॅँक आॅफ इंडियाकडून १६ कोटी १७ लाख कर्ज केले आहे. जिल्हा बॅँक - १८ कोटी ९१ लाख, पूर्वहंगामी ११ कोटी ५६ लाख यांसह ठेवी देणी १० कोटी ६९ लाख, चालू देणी ५६ लाख दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
या संचालक मंडळाने चांगला कारभार करून आर्थिक नियोजन केलेले नाही. गेल्या तीन वर्षांत दर कमी दिला, त्याच्यातील २३ कोटी ४९ लाख, लेव्ही साखर फरक एक कोटी, जुनी बी.एम.ए.मिल विकली तिचे
१ कोटी २५ लाख, शेअर्स वाढीव रक्कम १० कोटी, ठेवी शेअर्सला वर्ग केल्या, त्यातून वाचलेले देणे नऊ कोटी असे कोट्यवधी रुपये संचालक मंडळाला कोणत्याही कष्टाशिवाय मिळाले. हे या मंडळाचे चातुर्य अगर चांगले काम नव्हे.
साखरदरात ‘भोगावती’ इतर कारखान्यांच्या तुलनेत ४०० च्या फरकाने मागे आहे. तसेच मोलॅसिस बगॅसमध्ये व्यापाऱ्यांबरोबर संगनमत करून कोट्यवधीचा ‘ढपला’ पाडला आहे. अशा या संचालक मंडळाचा कारभार आॅडिट अहवालाच्या रूपाने बाहेर पडला आहे, असेही ते म्हणाले.
या संचालक मंडळाचा येत्या मंगळवारी (दि. २ सप्टेंबर) होणाऱ्या वार्षिक सभेत पंचनामा होणार आहे; म्हणूनच कारखान्याच्या सर्व सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनदेखील उदयसिंह पाटील यांनी यावेळी केले आहे. (प्रतिनिधी)