आपण मराठी भाषिकांबरोबर नाही हे फडणवीसांनी सिद्ध केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:24 AM2021-04-17T04:24:54+5:302021-04-17T04:24:54+5:30

बेळगाव : महाराष्ट्रात मागील ५ वर्षे सत्तेत असताना भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र एकीकरण समिती आणि येथील मराठी भाषिकांच्या मागण्या ...

Fadnavis proved that he is not with Marathi speakers | आपण मराठी भाषिकांबरोबर नाही हे फडणवीसांनी सिद्ध केले

आपण मराठी भाषिकांबरोबर नाही हे फडणवीसांनी सिद्ध केले

Next

बेळगाव : महाराष्ट्रात मागील ५ वर्षे सत्तेत असताना भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र एकीकरण समिती आणि येथील मराठी भाषिकांच्या मागण्या आणि अपेक्षांकडे दुर्लक्षच केले होते. आता भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ येथे येऊन मराठी भाषिकांबरोबर आपण नाही आहोत हे देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे, अशी परखड प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्रातील मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

बेळगाव येथे काही खासगी कामानिमित्त आले असता बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी हॉटेल मेरियट येथे ते पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि माननीय शरद पवार साहेब यांचे जुने संबंध आहेत. या भागातील मराठी भाषिकांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्याखाली एकत्र यावे, असा आमचा नेहमीच आग्रह राहिला आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने समस्त मराठी भाषिकांचे पुन्हा एकदा एकत्रीकरण झाले आहे. महाराष्ट्राला जोडले जाण्याच्या त्यांच्या इच्छेचा प्रभावीपणे पाठपुरावा व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी उभा आहे. महाराष्ट्रातील सर्वांचाच शुभम शेळके यांच्या उमेदवारीला पाठिंबा आहे, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

बेळगावात येऊन भाजप उमेदवाराचा प्रचार करणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना जयंत पाटील म्हणाले की, फडणवीस नेहमीच दिल्लीश्वरांना खूश करण्याच्या प्रयत्नात असतात. दिल्लीला बरं वाटेल असे बोलण्याची आणि वागण्याची त्यांची पद्धत आहे. शिवाय मागची पाच वर्षे महाराष्ट्रात भाजप सत्तेवर असताना त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि येथील मराठी भाषिकांच्या मागण्या आणि अपेक्षांकडे दुर्लक्षच केले आहे. आता आपण मराठी भाषिकांबरोबर नाही हे देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. खरे म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीबद्दल जी एक भावना असणे आवश्यक आहे, ती मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर त्यांच्याकडे दिसायला हवी होती, पण ती दिसली नाही हे दुर्दैव आहे. त्यांनी येथे येऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात भूमिका घेणे टाळायला हवे होते, असेही पाटील म्हणाले. पत्रकार परिषदप्रसंगी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी आणि प्रकाश मरगाळे उपस्थित होते.

तत्पूर्वी, एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना जयंत पाटील यांनी पाठिंबा दिला.

फोटो : समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी जयंत पाटील यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. त्यावेळी उपस्थित समितीचे नेते.

Web Title: Fadnavis proved that he is not with Marathi speakers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.