कौमार्य चाचणीत अपयशी, दोघी बहीणींना पाठवले कोल्हापूरात माहेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 08:21 PM2021-04-08T20:21:10+5:302021-04-08T21:14:30+5:30
Crime news Kolhapur-कौमार्य परिक्षेत अपयशी ठरल्याने दोन सख्ख्या बहीणींना विवाहनंतर अवघ्या तिसर्या दिवशी कोल्हापूरात माहेरी पाठवल्याची धक्कादायक घटना घडली. समाजाच्या जातपंचायतीनेही निर्णय देताना त्या मुलींना काडीमोड झाल्याचा आदेश दिल्याने दोन्ही पीडित मुलींवर आभाळ कोसळले.
कोल्हापूर : कौमार्य परिक्षेत अपयशी ठरल्याने दोन सख्ख्या बहीणींना विवाहनंतर अवघ्या तिसर्या दिवशी कोल्हापूरात माहेरी पाठवल्याची धक्कादायक घटना घडली. समाजाच्या जातपंचायतीनेही निर्णय देताना त्या मुलींना काडीमोड झाल्याचा आदेश दिल्याने दोन्ही पीडित मुलींवर आभाळ कोसळले.
कोल्हापूरातील उपनगरात राहणार्या कंजारभाट समाजातील दोघी बहिणींनी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांचा आधार घेत राजारामपूरी पोलीस ठाण्यात बेळगाव येथील संदीप सनी गागडे व सुरजीत गागडे या दोघा सख्ख्या भावांसह चौघांवर तक्रार दिली. माणुसकिला काळीमा फासणारा या प्रकाराबद्दल संतापाची लाट उमटत आहे.
कोल्हापुरातील उपनगरात राहणाऱ्या कंजारभाट समाजातील एका कुटुंबातील दोन सख्ख्या बहिणींचा विवाह बेळगाव (कर्नाटक) येथील हनुमान नगरातील संदीप व सुरजीत गागडे यांच्यासोबत दि. २७ नोव्हेंबर २०२० ला झाला होता. दोन्ही कुटूंबिय एकाच समाजातील असल्याने त्यांच्यात कोमार्य चाचणीची पद्धत आहे. त्यानुसार या दोन्ही मुलींची परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये एक मुलगी अपयशी ठरली.
घटनेनंतर संबंधित दोन्ही मुलींच्या चारित्र्यावर संशय घेत सासरच्या लोकांकडून त्यांच शारीरिक आणि मानसिक शोषण सुरू झाले. लग्नांनतर तीन दिवस या मुलींशी त्या पतींनी त्यांच्याशी शारिरीक संबधही ठेवले. त्यांनंतर त्यांनी त्या दोघींना घरातून हाकलून काढून कोल्हापूरात माहेरी पाठवले. मुलींच्या नातेवाईकांनी संबध जुळवण्यासाठी प्रयत्न केले, पण त्यात अपयश आले.
दरम्यान दि. ३ फेब्रुवारीला दोन्ही मुलींना व त्याच्या आईला कोल्हापुरात शाहू टोल नाक्यानजीकच्या एका मंदीरात बोलावून घेतले. तिथं जात पंचायत बसवली. पंचायतीने त्या दोन मुलींना काडीमोड झाल्याचा निर्णय दिला. तसेच दोन्ही मुले आणि मुलींना समाजातील विवाह इच्छुकांची विवाह करण्याचे स्वातंत्र असल्याचही स्पष्ट केले. पंचयतीने अचानक दिलेल्या या निर्णयान पीडित मुलींच्यावर आभाळ कोसळले.
घटनेनंतर पिडीत मुलींनी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मलन समितकडे रितसर अर्ज केला. त्यानुसार गुरुवारी राजारामपूरी पोलीस ठाण्यात संदीप गागडे, सुरजीत गागडे या दोघा भावांसह शोभा सनी गागडे, इश्वर गागडे यांच्याविरोधात तक्रार दिली. घटनेनंतर पीडित त्यांच्यावर तक्रार नोंदवण्याचे काम रात्री उशीरापर्यत सुरु होते.
पिडीत मुलींच्या कुटुंबियांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे रितसर लेखी दाद मागितली. त्यानुसार आम्ही पिडीत मुलींना घेऊन समितीच्या गीता हसुरकर, सीमा पाटील, रमेश वडणगेकर, सुजाता म्हेत्रे यांनी राजारामपूरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली-
सुजाता म्हेत्रे (अंनिस पदाधिकारी)
बाभळीच्या काट्या अन काडीमोड
शाहू टोल नाक्यानजीक मंदीरात जात पंचायतीने पिडीत मुली व संशयीत दोघा आरोपींसह त्यांची आई यांच्यासमोर बाभळीच्या पाच कांड्या समोर ठेवल्या. त्या एकमेकावर पाचवेळा मारुन त्या मुलींवरुन उतरुन दोन्ही बाजूला टाकल्या, झाले काडीमोड. असा जात पंचायतीचा नात्यातील काडीमोडची प्रथा असल्याचे पिडीतांनी सांगितले.