गतवेळी फंदफितुरीचा फटका; यंदाही तीच भीती

By admin | Published: October 7, 2015 12:15 AM2015-10-07T00:15:43+5:302015-10-07T00:17:17+5:30

शिवसेना नेतृत्वाचा कस : विधानसभेतील यशाचा फायदा घेणे गरजेचे

Failure of the last time; This is the same fear | गतवेळी फंदफितुरीचा फटका; यंदाही तीच भीती

गतवेळी फंदफितुरीचा फटका; यंदाही तीच भीती

Next

विश्वास पाटील -कोल्हापूर  महापालिकेच्या गतनिवडणुकीत ५२ जागा लढविणाऱ्या शिवसेनेला चारच ठिकाणी गुलाल लागला असला, तरी सोळा प्रभागांत या पक्षाचे उमेदवार दुसऱ्या स्थानांवर होते. यापैकी सहा ठिकाणी निसटता पराभव शिवसेनेच्या वाट्याला आला. याचा अर्थ तब्बल २० ठिकाणी शिवसेना स्पर्धेत होती. शिवसेनेला ३९ हजार २४ (साडे तेरा टक्के) मते मिळाली होती. गतवेळी भाजपला सोबतीला घेऊन हा युतीतील ‘मोठा भाऊ’ असलेला पक्ष रिंगणात उतरला होता. आता त्याला स्वबळावर लढावे लागत आहे. गतनिवडणुकीत पक्षांतर्गत फंदफितुरीचा फटका पक्षाला बसला होता. या निवडणुकीत दोन्ही गटांचे मनोमिलन झाले असले, तरी ते खरोखरंच कितपत हृदयापर्यंत उतरले आहे, यावरच शिवसेनेचे यश अवलंबून आहे. त्याअर्थाने आमदार राजेश क्षीरसागर यांच्याच नेतृत्वाचा खरा कस लागणार आहे.
गतवेळी शिवसेनेला झालेल्या प्रभागवार मतदानावर नजर टाकल्यास हे लक्षात येते की, या पक्षाला मानणारा मतदार सगळीकडे आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती होती; परंतु राज्यात व केंद्रातही सत्ता नव्हती. त्यामुळे सर्वच बाबतीत पक्षीय पाठबळ हवे तेवढे मिळाले नाही. दुसरे अत्यंत महत्त्वाचे की, अंतर्गत गटबाजी खूपच उफाळून आली होती. राजलक्ष्मीनगरातून विजय कुलकर्णी यांच्यासारख्या निष्ठावंताला वगळून ज्याचा त्या प्रभागाशी काहीच संबंध नाही, अशा राजेंद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली गेली. नागाळा पार्कमधून शारदा तुळशीकर निवडून येऊ नयेत यासाठी पक्षाच्याच कार्यकर्त्याच्या पत्नीस डमी उमेदवार उभा करणे, असे घाणेरडे राजकारण घडले. त्यामुळे गेल्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव लोकांनी नव्हे, तर पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाने केला. या निवडणुकीत त्यात थोडा सकारात्मक बदल झाला असून, आमदार क्षीरसागर व जिल्हाप्रमुख संजय पवार गट ताकदीने निवडणुकीला सामोरे जात असल्याचे चित्र वरकरणी तरी दिसते. प्रत्यक्षात मतदानापर्यंत अंतर्गत काय घडते यावरही शिवसेनेची यावेळेची कामगिरी निश्चित होईल.
या निवडणुकीतही उदय साळोखे यांना उमेदवारी देण्यावरून नाराजी व्यक्त झाली आहे. गटनेता संभाजी जाधव यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. ‘कैलासगडची स्वारी’ प्रभागातून जिल्हा प्रमुख विजय देवणे यांच्या मुलाने उमेदवारी मागितली असताना तिथे आमदाराचा आग्रह प्रताप जाधव यांच्यासाठी आहे. बिंदू चौकातूनही पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलून जितेंद्र सलगर यांच्यासाठी पायघड्या घातल्या जात आहेत. जिथे उमेदवार मातब्बर आहे व ती जागा निवडून येण्याची संधी जास्त आहे, तिथे निष्ठावंतास थांबवून दुसऱ्यास संधी दिली, तर समजू शकते; परंतु जिथे आपण स्पर्धेत नाही तिथेही कार्यकर्त्यास उमेदवारी देताना पायात पाय घालण्याचे राजकारण सध्या सुरू आहे. (उद्याच्या अंकात : काँग्रेस)


सहा ठिकाणी निसटता पराभव
शिवसेनेचा गेल्या निवडणुकीत सहा ठिकाणी निसटता पराभव झाला. त्यात शारदा तुळशीकर चार मतांनी, लक्षतीर्थ वसाहतीतून गणेश खाडे ३२ मतांनी, संत गोरा कुंभार वसाहतीतून नंदकिशोर डकरे हे ७३ मतांनी, खोलखंडोबातून अनिल पाटील १०३, तर चंद्रेश्वर गल्लीतील प्रकाश सरनाईक १०४ मतांनी व नाथा गोळे तालीम प्रभागातून मदन चोडणकर मातब्बर उमेदवारास टक्कर देऊन अवघ्या ११५ मतांनी पराभूत झाले.
बारा ठिकाणी नामुष्कीजनक मते
गत निवडणुकीत तब्बल बारा ठिकाणी पक्षाला अत्यंत नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामध्ये स्वातंत्र्यसैनिक वसाहतीतील राजू पोवार यांना अवघी ३७ मते मिळाली. त्यांच्यासह दौलतनगरातून संपता टिपकुर्ले यांना ९९, राजेंद्रनगरातून शांताबाई बिरंजे यांना ८९ व कसबा बावड्यातून काका खाडे यांना ४८ मते मिळाली. शुगर मिल प्रभागातून रघुनाथ पाटील यांना ११०, पाटोळेवाडी-कदमवाडीतून लक्ष्मण जानकर यांना १४५, विक्रमनगरातून वासंती धुमाळ यांना १५४, राजलक्ष्मीनगरातून राजेंद्र ऊर्फ बन्नाशेठ चव्हाण यांना कशीबशी १७५, शासकीय मध्यवर्ती कारागृहातून सुनील सामंत यांना १५२ मते मिळाली.
नेत्यांच्या भागातही पराभव
आमदार राजेश क्षीरसागर यांचे घर असलेल्या खोलखंडोबा प्रभागातही गेल्या निवडणुकीत चांगली लढत देऊनही शिवसेनेच्या अनिल पाटील यांचा पराभव झाला होता. जिल्हाप्रमुख संजय पवार स्वत: पोलीस लाईन प्रभागातून निवडणूक लढले; परंतु त्यांनाही पराभवास सामोरे जावे लागले. त्यांचा मूळ प्रभाग असलेल्या नागाळा पार्कमधून मात्र शिवसेनेच्या शारदा तुळशीकर यांचा विजय अवघ्या चार मतांनी हुकला. दुसरे जिल्हाप्रमुख विजय देवणे राहत असलेल्या शाहू मैदान प्रभागातूनही शिवसेना उमेदवाराचा पराभव झाला.


गतनिवडणुकीतील विजयी उमेदवार
स्मिता वैभव माळी (प्रभाग : भोसलेवाडी-कदमवाडी)- २५६९ मते
संभाजी जाधव (मंगेशकरनगर)-१४९२
राजू भीमराव हुंबे (सागरमाळ)-९७६
अरुणा टिपुगडे (संभाजीनगर बसस्थानक)-१८०३

Web Title: Failure of the last time; This is the same fear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.