Kolhapur: हुल्लडबाजांचा उतावळेपणा, प्रशासकीय अपयश; विशाळगडसह परिसरातील गावांमध्ये प्रचंड दहशत

By उद्धव गोडसे | Published: July 15, 2024 12:12 PM2024-07-15T12:12:17+5:302024-07-15T12:13:09+5:30

नियोजनाचा अभाव

Failure of administrative bodies including people's representatives to deal with the issue of encroachments on Vishalgad in harmony | Kolhapur: हुल्लडबाजांचा उतावळेपणा, प्रशासकीय अपयश; विशाळगडसह परिसरातील गावांमध्ये प्रचंड दहशत

छाया : दीपक जाधव

उद्धव गोडसे

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तापलेला विशाळगडावरील अतिक्रमणांचा मुद्दा सामंजस्याने हाताळण्यात लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय यंत्रणांना सपशेल अपयश आले आहे. आंदोलन होऊच नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने फारसे प्रयत्न केले नाहीत. गडावर किती लोक येतील याचा पोलिसांचा अंदाज चुकला. बंदोबस्ताचे नियोजन चुकले. यातच हुल्लडबाजांनी दिसेल त्या घराला लक्ष्य करून तोडफोड केल्याने विशाळगड आणि परिसराने प्रचंड दहशतीचा दिवस अनुभवला.

विशाळगडाच्या पायथ्याला गेल्या आठवड्यात हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या महाआरतीनंतर जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना याचे गांभीर्य लक्षात यायला हवे होते. माजी खासदार संभाजीराजे यांनी विशाळगडावर जाण्याचा आग्रह धरल्यानंतर त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न कुणीच केला नाही. चर्चेचे निमंत्रण धुडकावल्यानंतर अधिकाऱ्यांनी संभाजीराजेंची भेट घेतली असती तरी परिस्थिती वेगळी दिसली असली. अतिक्रमणांचा मुद्दा न्यायप्रविष्ट असून, राज्य सरकारकडून त्याचा पाठपुरावा सुरू असल्याची भूमिका मांडण्यात प्रशासन अपयशी ठरले. केवळ बंदी आदेश जाहीर करण्याची तत्परता प्रशासनाने दाखवली.

पुण्यातील हिंदू बांधव समितीने विशाळगडावर रविवारी आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते. हा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्यामुळे पुण्यात पोलिसांनी त्यांना रोखणे गरजेचे होते. मात्र, तसे काही झाले नाही. पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील गडप्रेमींनी सकाळीच गडाच्या पायथ्याला गर्दी केली. त्यांच्या संख्येचे अंदाज न आल्याने पोलिस बळ अपुरे पडले. गडावर जाणारे सर्व मार्ग रोखून धरण्यात पोलिसांना अपयश आले.

भर पावसात सुमारे सात ते आठ हजार गडप्रेमींची ये-जा सुरू राहिल्याने पोलिसांचे गर्दीवर नियंत्रण राहिले नाही. परिणामी, बेफान झालेल्या तरुणांनी घरांची आणि वाहनांची तोडफोड करून दहशत माजवली. लोकप्रतिनिधींसह संघटनांनी आणखी काही दिवस सामंजस्य दाखवले असते आणि प्रशासनाने चोख नियोजन केले असते, तर कदाचित तोडफोडीची दुर्घटना टळली असती.

हातोडे घेऊन चाल

गडाकडे जाणाऱ्या अनेक तरुणांच्या हातात हातोडे होते. त्यांनी हातोड्यांनी घरे, दुकानांची तोडफोड केली. माजी खासदार संभाजीराजे यांना बांबवडे येथे काही शिवभक्तांनी हातोडा भेट देऊन तातडीने अतिक्रमण जमीनदोस्त व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Web Title: Failure of administrative bodies including people's representatives to deal with the issue of encroachments on Vishalgad in harmony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.