मुदतीत घरफाळा न भरल्यास मिळकतीवर बोजा चढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:25 AM2021-03-17T04:25:18+5:302021-03-17T04:25:18+5:30
कोल्हापूर : घरफाळा सवलत योजनेचे आता शेवटचे १५ दिवस राहिले असून या कालावधीत उर्वरीत मिळकतधारकांनी या सवलत योजनेचा ...
कोल्हापूर : घरफाळा सवलत योजनेचे आता शेवटचे १५ दिवस राहिले असून या कालावधीत उर्वरीत मिळकतधारकांनी या सवलत योजनेचा लाभ घ्यावा अन्यथा यानंतर संबंधित मिळकतींवर बोजाची नोंद केली जाईल, असा इशारा महापालिकेच्यावतीने देण्यात आला आहे.
महापालिकेने एक हजार स्केअर फुटाच्या आतील मिळकतधारकांना दंडाच्या व्याजात दि. ३१ मार्चपर्यंत संपूर्ण घरफाळा भरल्यास पन्नास टक्के सवलत दिली जाणार आहे तर एक हजार स्केअर फुटाच्या वरील मिळकतधारकांना दंडाच्या व्याजात तीस टक्के सवलत दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे एक हजार चौ. स्क्वे. फुटांपर्यतच्या अनिवासी वापरातील मिळकतींना ४० टक्के , एक हजार चौ. स्क्वे. फुटांवरील अनिवासी वापरातील मिळकतींना ३० टक्के सवलत दिली जाणार आहे.
निवासी व अनिवासी वापरातील मिळकतींना दंड व्याजावरील सवलत येथून पुढे दिली जाणार नाही यावर्षी ही शेवटची संधी असल्याचे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सांगितले. त्यामुळे या सवलत योजनेचा उर्वरित मिळकतधारकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
दि. २६ जानेवारी ५ मार्चअखेर एकूण ९०७९ मिळकतधारकांनी लाभ घेतला असून या सलवतीमध्ये एकूण तीन कोटी २२ लाख ०४ हजार ८४३ रुपये दंड व्याजासह एकूण १२ कोटी १५ लाख ४८ हजार ८५६ रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे.
- ५२ कोटींचा घरफाळा जमा-
दि. १५ मार्चअखेर आत्तापर्यंत ५२ कोटी ८९ लाख ९४ हजार ७९२ रुपये इतका घरफाळा जमा झालेला आहे. यामध्ये मागील थकबाकी १३ कोटी ६९ लाख ६३ हजार २६९ इतकी आहे.