निधी खर्च टाकण्यावर गडबड, महापालिकेने दहा कोटींची बिले भागविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 11:41 AM2019-03-29T11:41:50+5:302019-03-29T11:43:50+5:30
आर्थिक वर्ष संपण्यास अवघे काही तास उरले असताना महापालिका प्रशासनातील अधिकारी मिळालेला निधी खर्च टाकण्याच्या कामात गुंतले आहेत. गेल्या आठ दिवसांत तब्बल ३० कामांच्या वर्क आॅर्डर देण्यात आल्या; तर ठेकेदारांची सुमारे १० कोटींची बिले भागविण्यात आली. अधिकाऱ्यांनी आता वसुलीवर सगळे लक्ष केंद्रित केले असून गुरुवारीही वसुलीचा एक कोटींचा टप्पा पूर्ण केला.
कोल्हापूर : आर्थिक वर्ष संपण्यास अवघे काही तास उरले असताना महापालिका प्रशासनातील अधिकारी मिळालेला निधी खर्च टाकण्याच्या कामात गुंतले आहेत. गेल्या आठ दिवसांत तब्बल ३० कामांच्या वर्क आॅर्डर देण्यात आल्या; तर ठेकेदारांची सुमारे १० कोटींची बिले भागविण्यात आली. अधिकाऱ्यांनी आता वसुलीवर सगळे लक्ष केंद्रित केले असून गुरुवारीही वसुलीचा एक कोटींचा टप्पा पूर्ण केला.
सन २०१८-१९ या आर्थिक वर्षातील शेवटचे दोन दिवस बाकी राहिले आहेत. या दोन दिवसांत वसुली आणि देणी भागविण्यावर महापालिकेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जोर दिला आहे. ठेकेदारांची बिले वेळेत मिळत नाहीत, अशी तक्रार नेहमी होत असते; पण गेल्या आठ दिवसांत तब्बल दहा कोटींची बिले भागविली गेली. सध्या सुरू असलेल्या ‘नगरोत्थान’मधील कामे संपविण्याचा प्रशासनाने कसोशीने प्रयत्न केला; परंतु त्यातील एक काम अपूर्ण राहिले आहे.
सन २०१७-१८ या सालातील नगरोत्थानची अडीच कोटींची कामे अपूर्ण कामात टाकून ती पुढील वर्षी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून मिळालेल्या ८० लाखांचा विशेष निधी मात्र यापूर्वीच खर्ची टाकण्यात आला. तसेच ही कामेही पूर्ण करून घेण्यात आल्याचे सार्वजनिक विभागातून सांगण्यात आले. यावर्षी राज्य सरकारकडून फारसा निधी मिळाला नाही. त्यामुळे नवीन कामांची प्रक्रिया राबविली नाही.
महापालिका स्वनिधीतून महसुली व भांडवली जमेतून करण्यात येणाऱ्या ३० हून अधिक कामांच्या वर्क आॅर्डर देण्यात आलेल्या आहेत. पॅचवर्कची कामे आधी करण्यात आली. त्यानंतर ऐच्छिक तसेच पदाधिकाऱ्यांचा निधी अशा टप्प्याने ही कामे केली जातात.
महसुली तसेच भांडवली जमेचा हिशेब ३१ मार्चपर्यंत होत राहतो. त्यामुळे जरी कामे या हेडमधून धरली असली तरी ती मार्चपर्यंत पूर्ण होत नाहीत. म्हणून अपूर्ण कामे या हेडखाली धरून ती पुढील वर्षात करण्याची महापालिकेत प्रथा आहे.
नागरी सुविधा केंद्रात गर्दी
आर्थिक वर्ष संपण्यास दोन दिवस राहिले असल्याने घरफाळा, पाणी बिले भरण्यास नागरी सुविधा केंद्रांवर नागरिकांची गर्दी होत आहे. रोज सरासरी एक ते सव्वा कोटीची वसुली होत आहे. गुरुवारीही नागरिकांची गर्दी कायम होती. सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू राहणाऱ्या या केंद्राची वेळ सायंकाळी सात वाजेपर्यंत वाढविण्यात आलेली आहे; तर रविवारी रात्री बारा वाजेपर्यंत ही केंद्रे सुरू राहणार आहेत. गुरुवारी जवळपास एक कोटीची जमा झाल्याचे सांगण्यात आले.