Kolhapur: 'फर्निचर स्वस्तात घ्या,’ फेसबुकवरून फसवणूक!; अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांची बनावट अकाऊंट
By समीर देशपांडे | Published: June 10, 2024 04:33 PM2024-06-10T16:33:49+5:302024-06-10T16:33:49+5:30
समीर देशपांडे कोल्हापूर : काही महिन्यांपूर्वीची गोष्ट. कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या फेसबुक अकाऊंटच्या मेसेंजरवरून एका व्यक्तीला मराठीत ...
समीर देशपांडे
कोल्हापूर : काही महिन्यांपूर्वीची गोष्ट. कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या फेसबुक अकाऊंटच्या मेसेंजरवरून एका व्यक्तीला मराठीत मेसेज आला. ‘माझे एक मित्र लष्करामध्ये पुण्यात होते. त्यांची अचानक बदली आसामला झाली आहे. त्यांना इथले नवीनच घेतलेले फर्निचर नेणे शक्य नाही. तेव्हा तुम्ही घेता का बघा. मी त्यांना तुमचे नाव सांगितले आहे.’ देसाई यांची ओळख असल्यामुळे त्यांना ही गोष्ट खरीच वाटते आणि इथूनच मग ‘फेक फेसबुक अकाऊंट’चा फसवणुकीचा खेळ सुरू होतो. राज्यातील अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नावावर अशी फसवणूक मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.
संबंधित व्यक्ती तुमचा नंबर मागते. तो दिला जातो. त्या नंबरच्या व्हॉट्सॲवर फर्निचरचे फोटो पाठवले जाता. खरोखरच ते नवीन असते. तुलनेत किमती कमी असतात. फ्रीज, वॉशिंग मशीन, टीव्ही, सोफा सेट आकर्षक असतात. इतक्या कमी किमतीत जर एवढे साहित्य मिळत असेल तर मग का घ्यायचे नाही, अशी संबंधिताची मानसिक स्थिती होत असतानाच तिकडून फोन येताे. आम्ही उद्याच बदलून जाणार असल्याने आजचा दिवसच आमच्याकडे आहे. तुम्ही इतके पैसे पाठवलात तर इकडूनच भाड्याचा ट्रक करून साहित्य पाठवतो.
तुमचा विश्वास बसलेला असतो. तुम्ही पहिली रक्कम त्यांना ऑनलाइन पाठवता. मग पुन्हा त्यांच्याकडून आणखी दोन चांगल्या वस्तू कमी किमतीत फोटोवरून दाखवल्या जातात. आणखी २५ हजार पाठवले जातात. आल्यावर साहित्य कुठे उतरून घ्यायचे, हे ठरवले जाते. पत्ता विचारला जातो. शहरात आल्यावर फोन करा म्हणून सांगितले जाते. ट्रक निघाल्याचा फोटो पाठवला जातो. परंतु मध्येच फोन येताे. ट्रक अलीकडे अडवण्यात आला आहे. पोलिस दहा हजार रुपये मागत आहेत. ट्रक तुमच्या गावात आला की तुम्हाला पैसे परत देतो. आता लाखभर दिलेत, साहित्य थोड्या वेळात पोहोचणार आहे. मग दहा हजार द्यायला काय अडचण, असा विचार करून काही जण पैसे पाठवतात आणि मग नंतर पलीकडचा फोन नंबर बंद होतो. परत तुम्हाला फोनही येत नाही आणि साहित्यही पोहोचत नाही. तुम्ही दहावेळा फोन करता; परंतु तो फोन बंदच असतो. तुम्ही पूर्णपणे फसल्याचे असल्याच लक्षात येते.
जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक अधिकाऱ्यांचे बनावट अकाऊंट
पुण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी राजेश देशमुख, कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी दौलत देसाई, कोल्हापूर महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, सध्याचे ‘म्हाडा’चे मु्ख्याधिकारी अशोक पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची बनावट फेसबुक अकाऊंट काढली जातात. ती फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली जाते. मेसेंजरवरून मेसेज येतात आणि दक्ष न राहण्याची फसवणूक होते.