५७ कोटींचा बनावट धनादेश प्रकरण: कोल्हापूर जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी हात झटकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 12:19 IST2025-03-25T12:18:51+5:302025-03-25T12:19:33+5:30
सुट्टीदिवशी येऊन धनादेश पास का केला..?

५७ कोटींचा बनावट धनादेश प्रकरण: कोल्हापूर जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी हात झटकले
कोल्हापूर : बनावट धनादेशाद्वारे जिल्हा परिषदेला ५७ कोटींचा गंडा घालण्याच्या प्रयत्नातील गुन्ह्यात शाहूपुरी पोलिसांनी जिल्हा बँकेतील चार कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले. मात्र, या चारही कर्मचाऱ्यांनी मुंबईतील धनादेश मुद्रणालयाकडे बोट दाखवले. बनावट धनादेश पास होण्याशी आपला काही संबंध नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. मात्र, रिझर्व्ह बँकेचे निकष डावलून धनादेश पास कसा झाला? याच्या मुळाशी जाऊन पुन्हा चौकशी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बनावट धनादेशांद्वारे जिल्हा परिषदेच्या बँक खात्यातील ५७ कोटी रुपये हडपण्याचा प्रयत्न होताच जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी जिल्हा बँकेतील कर्मचारी शैलेंद्र गायकवाड, विजय व्हरांबळे, वीरेंद्र शिंदे आणि सुनील रणभिसे या चौघांची चौकशी केली. त्यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. मात्र, बनावट धनादेशाशी आपला काही संबंध नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
धनादेश पास करणे ही नियमित प्रक्रिया आहे. नेहमीप्रमाणे जिल्हा परिषदेचा धनादेश पास केल्याचा उल्लेख त्यांनी जबाबात केला आहे. मुंबईत (भिवंडी) धनादेश छपाईचे काम करणाऱ्या मुद्रणालयाकडे बोट दाखवून त्यांनी अंग झटकण्याचा प्रयत्न केला आहे. गाझियाबाद येथून अटक केलेला संशयित कपिल चौधरी याच्या चौकशीतून काही महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांची पुन्हा सखोल चौकशी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जिल्हा परिषदेतील दोघांची चौकशी
जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील विशाल चंद्रकांत चौगुले (वय ३०) आणि सुफियान शहाबुद्दीन जमादार (२८) यांची चौकशी करून पोलिसांनी जबाब नोंदवले. ज्या नंबरचा धनादेश जिल्हा परिषदेतून बाहेर गेलाच नाही तोच पास झाल्याने शंका आल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. मुंबईतील मुद्रणालयात काम करणाऱ्या ४३ कर्मचाऱ्यांची माहिती घेऊन यातील सहा जणांचे जबाब नोंदवले आहेत.
उपअधीक्षकांनी घेतला आढावा
शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी सोमवारी या गुन्ह्याच्या तपासाचा आढावा घेतला. आजवर चौकशी केलेले संशयित, मुंबई, दिल्ली आणि गाझियाबाद येथील तपास आणि नावे निष्पन्न झालेल्या संशयितांची माहिती उपअधीक्षक टिके यांनी घेतली. तसेच पुढील तपासाबद्दल तपास अधिकारी अभिजित पवार यांना सूचना दिल्या.
सुट्टीदिवशी येऊन धनादेश पास का केला..?
जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी १९ फेब्रुवारीस शिवजयंतीची सुट्टी असतानाही कार्यालयात येऊन धनादेश पास केला आहे. ५ लाखांहून जास्त रक्कम असल्यास ज्यांनी धनादेश दिला आहे, त्यांची परवानगी लागते, तशी कोणतीच लेखी किंवा तोंडी परवानगी जिल्हा परिषदेने दिली नव्हती तरीही बँकेचे व्यवस्थापक अजित पाटील यांनी हा धनादेश पास केला. त्यांनी ही तत्परता दाखवली नसती तर पुढचे रामायणच घडले नसते. त्यांना याबद्दल नोटीस काढणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले होते, परंतु प्रत्यक्षात त्यांना साधी नोटीसही निघालेली नाही.