हाँकाँगमधून कागद मागवून छापल्या बनावट नोटा, कोल्हापुरातील दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 12:29 IST2025-02-22T12:28:59+5:302025-02-22T12:29:35+5:30
केंद्रीय तपास यंत्रणेची कारवाई

हाँकाँगमधून कागद मागवून छापल्या बनावट नोटा, कोल्हापुरातील दोघांना अटक
कोल्हापूर : हाँकाँगमधील हाय सिक्युरिटी थ्रेडचा कागद मागवून बनावट नोटा छापणारा आणि ते चलनात आणणारा अशा दोघांना करवीर पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. सिद्धेश श्रीकांत घाटगे (रा. दत्तोबा शिंदेनगर कळंबा, ता. करवीर) आणि विकास वसंत पानारी (रा. शिवसृष्टी पार्क शाकंभरी कॉलनी, शिंगणापूर) अशी याप्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत.
गुरुवारी रात्री ही कारवाई झाली. यांच्याकडून १२०० रुपयांची बनावट नोटा, बनावट नोटा छापलेले प्रिंटर्स पोलिसांनी जप्त केले आहेत. संशयित आरोपींना २५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिले आहेत.
पोलिसांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या तपास यंत्रणेला घाटगे हे घरी बनावट नोटा छापत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी गोपनीयपणे सापळा रचून छापा टाकला. त्यावेळी घाटगे याने सरकारचा महसूल बुडवण्यासाठी बाहेरील देशातून साधनसामग्री मागवून बनावट नोटा छापत होते. त्यांना अटक करून त्यांच्याकडील ए फोर साइझचे चार पेपर, पन्नास रुपयांच्या सहा बनावट नोटा, २०० रुपयांच्या चार बनावट नोटा, ५०० रुपयांच्या चार बनावट नोटा, कोऱ्या कागदावर हाय सिक्युरिटी थ्रेड असलेली रंगीत पट्टी त्यावर आरबीआय आणि भारत असे छापलेेले कागद जप्त करण्यात आले.
घाटगे यांच्याकडे चौकशी केल्यानंतर बनावट नोटा चलनात आणणारा विकास पानारी यालाही पोलिसांनी अटक केली. केंद्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून याची नोंद पोलिसात झाली आहे.
काही तरुण कळंब्यात बनावट नोटा छापण्याचे काम करतात आणि त्याची माहिती थेट केंद्रीय तपास यंत्रणेपर्यंत पोहोचते आणि स्थानिक पोलिसांना त्याचा काहीच सुगावा लागत नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.