सुरत लुटीचा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खोटा इतिहास, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांचा आरोप

By पोपट केशव पवार | Published: September 2, 2024 04:31 PM2024-09-02T16:31:29+5:302024-09-02T16:37:02+5:30

लुटीची खबर औरंगजेबास कळाली; नागपूरकरांना अजून उमगली नाही

Fake history of Surat loot by Devendra Fadnavis, accusation of history researcher Indrajit Sawant | सुरत लुटीचा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खोटा इतिहास, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांचा आरोप

सुरत लुटीचा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खोटा इतिहास, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांचा आरोप

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुरत लुटीचा इतिहास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या राजकीय रणनीतीसाठी खोट्या पद्धतीने सांगत असल्याचा आरोप इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी रविवारी केला. शिवरायांनी सुरतेच्या केलेल्या प्रचंड लुटीची खबर औरंगजेबास लाहोर येथे समजली होती. पण, नागपूरच्या फडणवीसांना अजून ती उमजलेली नाही. तुम्ही राजकारण करा, पण इतिहास बिघडवून नको, असा खोचक सल्लाही सावंत यांनी दिला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटलीच नाही. उलट सुरतच्या लोकांनी तिथे छत्रपतींचा पुतळा बसवला आहे. तरीही काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत लुटली अशीच शिकवण दिली. या गोष्टीची काँग्रेस माफी मागणार का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. या पार्श्वभूमीवर सावंत यांनी व्हिडीओ करत फडणवीस यांचा दावा खोडून काढला आहे.

सुरत शहराला मुघली साम्राज्यात बंदर-ए-मुबारक, मुघली साम्राज्याच्या गालावरचा तीळ आहे, असेही म्हटले जायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६४ आणि १६७० अशा दोन वेळेस औरंगजेबाचे बंदर असलेल्या सुरतेवर छापा टाकत ते दोनवेळा लुटले. यावेळी शिवाजी महाराजांनी वीरजी व्होरा, हाजी बेग, हाजी सय्यद या बड्या व्यापाऱ्यांकडून प्रचंड मोठी संपत्ती आणली होती. सुरतच्या पहिल्या लुटीवेळी इनायत खान हा सुरतेचा सुभेदार होता. त्याने शिवाजी महाराजांकडे एक दूत पाठवला होता. त्याच्यासोबत खानाने एक मारेकरी पाठवत शिवाजी महाराज यांच्याशी दगाफटका करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतापलेल्या मावळ्यांनी सुरतेला आग लावून सुरत बेचिराख केली होती, हा इतिहास आहे. 

सुरतेची लूट हे मध्ययुगातील मुघलांची अर्थव्यवस्था बिघडविण्यासाठी शिवाजी महाराजांनी टाकलेले पाऊल होते. स्वराज्याची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी या संपत्तीचा वापर करण्यात आला, हा इतिहास आहे. पण, देवेंद्र फडणवीस आता खोटा इतिहास सांगत आहेत. ही त्यांची राजकीय रणनीती असावी. शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्रात आणल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले. पण, ही शिवरायांची वाघनखे नाहीत. राजकारण करा; पण, इतिहास बिघडविण्याचे काम करू नका, असे इंद्रजीत सावंत यांनी आपल्या व्हिडीओत म्हटले आहे.

Web Title: Fake history of Surat loot by Devendra Fadnavis, accusation of history researcher Indrajit Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.