कोल्हापुरात तोतया पत्रकाराने उकळली तीन लाखांची खंडणी, विक्रेत्यास धमकावले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 12:15 PM2024-10-10T12:15:02+5:302024-10-10T12:15:53+5:30

आठ ते दहा जणांवर गुन्हा, एक ताब्यात

fake journalist extorted three lakhs In Kolhapur, threatened the seller | कोल्हापुरात तोतया पत्रकाराने उकळली तीन लाखांची खंडणी, विक्रेत्यास धमकावले

कोल्हापुरात तोतया पत्रकाराने उकळली तीन लाखांची खंडणी, विक्रेत्यास धमकावले

कोल्हापूर : तोतया पत्रकार अन्सार रफिक मुल्ला (रा. कोल्हापूर) याने लक्ष्मीपुरीतील प्लास्टिक विक्रेत्यास कारवाई करण्याची भीती घालून तीन लाख रुपयांची खंडणी उकळली, तसेच त्याचा साथीदार अजित पांडुरंग पवार (वय ४७, रा. बिंदू चौक) याने पाच लाखांची मागणी करून विक्रेत्यास जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार सोमवारी (दि. ७) घडला.

याबाबत विक्रेते सनी शंकरलाल दर्डा (वय ३५, रा. गांधीनगर) यांनी बुधवारी (दि. ९) लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित मुल्ला, पवार आणि मयूर ऊर्फ गणेश मोहन कांदळकर (४०, रा. रविवार पेठ) या तिघांसह अनोळखी सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल केला. यातील अजित पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतले. लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास तोतया पत्रकार अन्सार मुल्ला हा सात ते आठ अनोळखी तरुणांसह लक्ष्मीपुरीतील पान लाइन येथील अमृत प्लास्टिक या दुकानात घुसला. मोबाइलवर चित्रीकरण घेत त्याने दुकान सील करण्याची धमकी दिली.

बेकायदेशीर प्लास्टिक विक्री करीत असल्याबद्दल तुमची बातमी करणार. त्यानंतर तुमच्या दुकानाला टाळे लागणार. यापूर्वी आम्ही गांधीनगरातील दुकानांच्या बातम्या केल्यानंतर अनेक दुकाने बंद झाली आहेत, अशी भीती घातली. कारवाई टाळण्यासाठी एका तासाच्या आत पाच लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. पैसे दिले नाहीत तर जिवे मारू, असे धमकावले. त्यानंतर काही वेळाने तीन लाख रुपये घेऊन मुल्ला निघून गेला.

दुसऱ्या दिवशी दुसरी टोळी

मुल्ला याने तीन लाख रुपये उकळल्यानंतर दुसऱ्या दिवशी बिंदू चौकातील अजित पवार हा दर्डा यांच्या दुकानात गेला. त्याने पाच लाखांच्या खंडणीची मागणी केली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने पवार याला अटक केली. मुल्ला याच्या सांगण्यावरून खंडणी मागण्यासाठी गेल्याचे पवार याने पोलिसांना सांगितले.

अनेकांना गंडा

गुन्हा दाखल झाल्याचे समजताच मुल्ला पसार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोर्टल आणि यूट्यूबवर बातम्या देणाऱ्या काही तोतया पत्रकारांनी शहरातील अनेकांना गंडा घातल्याची शक्यता वर्तवली जात आहे. संबंधितांनी तक्रारी द्याव्यात, असे आवाहन पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी केले आहे.

Web Title: fake journalist extorted three lakhs In Kolhapur, threatened the seller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.