भाड्याच्या घरातच थाटला बनावट दारूचा कारखाना, बोंद्रेनगर परिसरात कारवाई, दोघांना अटक, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त
By उद्धव गोडसे | Published: November 5, 2023 03:28 PM2023-11-05T15:28:02+5:302023-11-05T15:30:48+5:30
पथकाने बनावट देशी दारू, स्पिरीट, रसायन, बाटल्या आणि कार असा सुमारे १५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
कोल्हापूर : पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील बोंद्रेनगर परिसरात मथुरानगरी येथे भाड्याने घेतलेल्या घरात थाटलेल्या बनावट दारूच्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली. शनिवारी (दि. ४) दुपारी केलेल्या कारवाईत कारखान्याचा मालक परशराम उर्फ पिंटू कुबेर केसरकर (वय ४०, रा. नांगनूर, ता. चिकोडी, जि. बेळगाव) आणि स्पिरीट पुरवणारा ओमप्रकाश माताप्रसाद शुक्ला (वय ५२, रा. गांधीनगर, ता. करवीर) या दोघांना अटक केली. पथकाने बनावट देशी दारू, स्पिरीट, रसायन, बाटल्या आणि कार असा सुमारे १५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोंद्रेनगर परिसरात बनावट दारू निर्मितीचा कारखाना सुरू असल्याचे समजले होते. मथुरानगरी येथील एका घरावर पाळत ठेवून खात्री केल्यानंतर पथकाने शनिवारी दुपारी छापा टाकला. यावेळी संशयित परशराम केसरकर हा बनावट दारूच्या बाटल्या भरताना रंगेहाथ सापडला. पथकाने त्याच्याकडील १४४० लिटर स्पिरीट, रेठरे संत्रा आणि डॉक्टर जीएम नावाच्या बनावट दारूच्या २४०० बाटल्या, लेबल, टोपणे, पॅकिंग मशिन असा ११ लाख १४ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
केसरकर याच्यासह स्पिरीट पुरवणारा ओमप्रकाश शुक्ला याला त्याच्या गांधीनगर येथील घरातून अटक केले. स्पिरीटच्या वाहतुकीसाठी वापरलेली चार लाखांची कारही पथकाने जप्त केली. यांना मदत करणा-या अन्य संशयितांचा शोध सुरू आहे. दोघांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई निरीक्षक पी. आर. पाटील, संभाजी बर्गे, नंदकुमार देवणे, पंकज कुंभार, राजू दिवसे, अशोक साळोखे, आदींच्या पथकाने केली.