सोशल मीडियावरील फेक पोस्टने उमेदवारांना ‘फेस’! : निवडणूक आयोगही गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 08:44 PM2019-09-26T20:44:08+5:302019-09-26T20:45:32+5:30
परंतु त्याचा नेमका सामाजिक परिणाम काय होणार आहे, याचा विचारही केला जात नाही. परिणामी अनेक ठिकाणी जातीय तणावापासून ते राजकीय संघर्षापर्यंत वेळ येते. त्यामुळेच अशा पोस्ट टाकण्यापासून सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाकडूनही केले जात आहे.
कोल्हापूर : ‘सत्य सांगण्यासाठी एक गल्ली फिरेपर्यंत असत्य गावभर फिरून आलेले असते’ असे सांगितले जाते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरील याच प्रकारच्या खऱ्या-खोट्या पोस्टमुळे उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पडलेली पोस्ट खरी आहे की खोटी याची शहानिशा करायची कधी आणि मग त्याचा खुलासा करायचा कधी, असा प्रश्न या सर्वांसमोरच उभा ठाकला आहे. मात्र, याबाबत निवडणूक आयोगानेही स्पष्ट सूचना दिल्या असून, खोट्या पोस्टबाबत आणि त्या शेअर केल्याबाबतही तक्रार केल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे याबाबत दक्षता घेण्याची गरज आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरण लोकसभेपाठोपाठ आता विधानसभा निवडणुकीमुळेही तापले आहे. हे वातावरण तापविण्यामध्ये सोशल मीडियाचाही मोठी भूमिका राहिली आहे. सुरुवातीच्या काळात उमेदवाराविषयी गैरसमज पसरविणाºया पोस्ट टाकणे, जुन्या भाषणांचे व्हिडीओ टाकून अमूक नेते तमूक नेत्याच्या व्यासपीठावर गेले, त्यांनी पाठिंबा दिला, अशा पोस्ट टाकून गोेंधळ निर्माण करण्याचाही प्रयत्न या माध्यमातून काहीजण करत असतात.
संबंधित उमेदवारांच्या सहकारी संस्था, त्यातील गैरकारभार, उसाची बिले दिली आहेत का बुडवली आहेत या सगळ्यांचा पंचनामा खºया-खोट्या आकडेवारीनुसार केला जात असल्याने यामध्ये विश्वास कुणावर ठेवायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जो-तो कार्यकर्ता आपला नेता कसा चांगला आहे आणि विरोधातील कसा वाईट आहे, हे सांगण्यासाठी मोडतोड केलेले व्हिडीओ वापरून, आवाज बदलून पोस्ट व्हायरल करतात. त्यामुळे याचा त्रास उमेदवार आणि त्यांच्या घरच्यांनाही सोसावा लागत आहे.
या निवडणुकीची बहुतांश सूत्रे युवकांच्या हातात असताना आणि त्यांच्याच हातामध्ये सोशल मीडियाचे प्रभावी अस्त्र असल्याने याची दखल सर्वांकडून घेतली जात आहे. अनेकदा आठ-दहा जणांचा गट एकत्र येऊन मजा म्हणूनही काही पोस्ट टाकतो; परंतु त्याचा नेमका सामाजिक परिणाम काय होणार आहे, याचा विचारही केला जात नाही. परिणामी अनेक ठिकाणी जातीय तणावापासून ते राजकीय संघर्षापर्यंत वेळ येते. त्यामुळेच अशा पोस्ट टाकण्यापासून सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाकडूनही केले जात आहे.
उमेदवाराला काही सांगायचेच नाही
अनेकदा खोट्या पोस्टमुळे उमेदवारच अस्वस्थ होतो. त्यामुळे अशा प्रकारच्या नकारात्मक पोस्टची माहिती उमेदवारांपर्यंत पोहोचू द्यायची नाही, अशी दक्षता आता संबंधितांचे निकटवर्तीय घेत आहेत. ‘कुणीही उठावं आणि काहीही टाकावं’ असे हे माध्यम असल्याने काहींनी ही दक्षता घेतल्याचे सांगण्यात आले.