बनावट बियाणे शेतकर्यांच्या माथी
By admin | Published: May 27, 2014 12:40 AM2014-05-27T00:40:44+5:302014-05-27T00:41:06+5:30
कृषी विभागाचे दुर्लक्ष : हजारो रुपयांचा फटका
आमजाई व्हरवडे : लाखो रुपयांचे बनावट बियाणे शेतकर्यांच्या माथी मारून खासगी दुकानदारांकडून शेतकर्यांची राजरोस लुटमार केली जात आहे. एवढी मोठी शेतकर्यांची लूट होत असताना राधानगरीतील दोन्ही कृषी विभागांचे अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवून वेळ मारून नेत असल्याने शेतकर्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील खरीप व रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात भात व गळिताची पिके घेतली जातात. खरीप हंगामात भातपिकाखाली मोठे क्षेत्र असते. शेतकर्यांच्या माथी बनावट भात बियाणे मारणारे रॅकेट गेली अनेक वर्षे सक्रिय आहे. गतवर्षी तालुक्यात कर्नाटकातील एका कंपनीने वितरित केलेले भात पोसवण्यास तब्बल सहा महिन्यांचा कालावधी लागला होता. परिणामी शेतकर्यांना हजारो रुपयांचा फटका बसला होता. याबाबत तक्रारी होऊनही राज्य शासनाचे कृषी खाते व पंचायत समितीच्या कृषी खात्याने केवळ पंचनामे करण्याचे काम तेवढे युद्धपातळीवर केले. त्यानंतर शेतकर्यांना त्यांची नुकसानभरपाई मात्र काहीच मिळाली नाही. यंदाच्या रब्बी हंगामात तर सूर्यफुलाला दाणेच धरलेले नाहीत. अनेक गावांत हा प्रकार घडूनही कृषी खात्याच्या अधिकार्यांनी कानावर हात ठेवले आहेत. मशागत, खते, पाणी व मजुरीचे पैसेही शेतकर्यांच्या अंगावर बसले आहेत. शेतकर्यांना हजारो रुपयांचा तोटा झाला आहे. मात्र, एवढे घडूनही कोणत्याही खासगी दुकानदारावर कारवाई करण्याचे धाडस कृषी अधिकार्यांनी केलेले नाही. पंचायत समितीचा गुणनियंत्रण विभाग केवळ नावालाच आहे. शेतकर्यांची खुलेआम लूट होत असताना कोणत्याही लोकप्रतिनिधीने ‘ब्र’ शब्द काढलेला नाही. त्यामुळे शेतकर्यांना ‘वाली’ कोण आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शासन व पंचायत समितीच्या कृषी अधिकार्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शेतकर्यांतून होत आहे. (वार्ताहर)