फायटर मेंढ्याने रोखली महालक्ष्मी एक्स्प्रेस, एक तास विलंबाने ट्रेन मुंबईला रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2017 08:44 PM2017-10-06T20:44:23+5:302017-10-06T20:44:31+5:30
कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून प्रवास करणा-या फायटर मेंढ्याने रेल्वेत धडका देऊन गोंधळ घातल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस सांगली स्थानकात सुमारे एक तास थांबविण्यात आली.
मिरज : कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून प्रवास करणा-या फायटर मेंढ्याने रेल्वेत धडका देऊन गोंधळ घातल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस
सांगली स्थानकात सुमारे एक तास थांबविण्यात आली. मेंढ्यास रेल्वेतून उतरविल्यानंतर एक तास विलंबाने महालक्ष्मी एक्स्प्रेस मुंबईला रवाना
करण्यात आली.
प्रवासी रेल्वे गाड्यांतून बकरी, मेंढी व पाळीव कुत्र्यांना पाठविण्याची व्यवस्था आहे. मालकासोबत प्रवास करणा-या या पाळीव प्राण्यांना रेल्वे
गार्डच्या कक्षात जाळी असलेल्या बॉक्समध्ये ठेवण्यात येते. गुरूवारी रात्री मिरजेतून पुण्याला मेंढ्यांच्या टकरीच्या स्पर्धेसाठी मिरजेतील
हारूण शेख नावाच्या व्यक्तीने एक मजबूत फायटर मेंढा महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून पाठविला होता. या मेंढ्यास जाळीच्या बॉक्समध्ये ठेवण्यात
आले होते. मात्र बॉक्समध्ये बंदीस्त केलेल्या या फायटर मेंढ्याने मिरजेपासून सांगलीपर्यंत धडका देऊन बॉक्सची जाळी तोडून टाकली. यामुळे
घाबरलेले गार्ड डब्ल्यू. डी. धार्मिक यांनी सांगली स्थानकात फायटर मेंढ्याला रेल्वेतून खाली उतरविल्याशिवाय गाडीसोबत पुढे जाण्यास नकार
दिला. रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने गार्डच्या कक्षातून मेंढ्यास खाली उतरविण्याचा प्रयत्न केला.
मात्र मोठी शिंगे व धिप्पाड असलेल्या मेंढ्याने आक्रमक पावित्रा घेऊन धडका देण्याचा सपाटा लावल्याने कोणालाही त्याला हात लावण्याची हिंमत झाली नाही. पाळीव प्राण्यासोबत मालकाने प्रवास करणे बंधनकारक आहे, मात्र या मेंढ्याचा मालक सोबत नसल्याने व त्याचा मोबाईल बंद असल्याने मिरजेत संपर्क साधून हारूण शेख यास सांगलीत पाचारण करण्यात आले. शेख याने गोंधळ घालणा-या मेंढ्यास रेल्वेतून खाली उतरविले. सुमारे एक तासाच्या या नाट्यानंतर महालक्ष्मी एक्स्प्रेस मुंबईकडे रवाना झाल्यानंतर रेल्वे कर्मचारी व प्रवाशांना हायसे वाटले. मेंढ्याने धडका देऊन महालक्ष्मी एक्स्प्रेसला रोखल्याच्या घटनेबाबत प्रवासी आश्चर्य व्यक्त करीत होते.