फाळकुट दादांची पोलिसांवर मगरुरी, एकेरी भाषा वापरत दिली धमकी; कोल्हापुरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 13:01 IST2024-09-19T12:59:46+5:302024-09-19T13:01:46+5:30
कळंबा: येथील साई मंदिर चौकात काल, बुधवारी भर वर्दळीच्या रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या दोन गावठी गावगुंडांनी धुमाकूळ घातला. अल्पवयीन ...

फाळकुट दादांची पोलिसांवर मगरुरी, एकेरी भाषा वापरत दिली धमकी; कोल्हापुरातील घटना
कळंबा: येथील साई मंदिर चौकात काल, बुधवारी भर वर्दळीच्या रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या दोन गावठी गावगुंडांनी धुमाकूळ घातला. अल्पवयीन फाळकुदादांनी पोलिसांवरच आरेरावी केली. शिवाय एकेरी भाषा वापरून पोलिसांना दगड मारण्याची धमकी दिली. यावेळी खाकी वर्दी हतबल झाल्याचे सर्वसामान्य नागरिकांना पहावयास मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सदर फाळकुटदादा राजेंद्र नगर, जवाहर नगर परिसरातील असल्याची चर्चा आहे. कळंबा साई मंदिर चौकातील खाऊ गल्लीत असणार्या हात गाडीवर वादावादी करून राडा करण्याचे प्रकारात वाढ झाली आहे. पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या फाळकुटदादांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. दरम्यानच काल, बुधवारी गावगुंडांनी पोलिसांवर मगरुरी केल्याने कायद्याचा धाकच राहिला नसल्याचे समोर आले.
साईमंदिर चौक बनला गुन्हेगारीचा अड्डा
साई मंदिर चौकातील खाऊ गल्लीनजीक इमारतीत जिल्ह्यातील नामांकित मटकाकिंगचा अड्डा खुलेआम सुरू आहे. त्यावर कारवाई होतच नाही. येथील भाजीमंडई ओपन बार बनली आहे. हद्दपार गुन्हेगारांचा वावर येथे नित्याचा बनला आहे.