कोल्हापूर जिल्ह्यात वळिवाची हजेरी: विजांच्या कडकडाटासह पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 01:57 PM2019-04-01T13:57:48+5:302019-04-01T13:58:54+5:30
विजांच्या कडकडाटासह वळीव पावसाने शनिवारी (दि. ३०) मध्यरात्रीनंतर जोरदार हजेरी लावली. दिवसभर उन्हाच्या तडाख्याने घामाघूम झालेल्या नागरिकांना रात्रीच्या पावसाने निर्माण झालेल्या गारव्याने दिलासा मिळाला. शहरातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
कोल्हापूर : विजांच्या कडकडाटासह वळीव पावसाने शनिवारी (दि. ३०) मध्यरात्रीनंतर जोरदार हजेरी लावली. दिवसभर उन्हाच्या तडाख्याने घामाघूम झालेल्या नागरिकांना रात्रीच्या पावसाने निर्माण झालेल्या गारव्याने दिलासा मिळाला. शहरातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
शनिवारी दिवसभर उन्हाचा तडाखा जाणवत होता. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उष्म्याने नागरिक हैराण झाले होते. रात्री अकरानंतर वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले. यानंतर शहरासह आसपासच्या भागांत पावसाचा शिडकावा झाला.
यामुळे हवेत थोडा गारवा निर्माण झाला; परंतु मध्यरात्रीनंतर राधानगरी, करवीर, इचलकरंजीसह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी विजांचा कडकडाट होेऊन पाऊस झाला. तब्बल दोन तास पावसाने हजेरी लावल्याने हवेत गारवा निर्माण झाला. विजांच्या कडकडाटामुळे काही काळ वीजपुरवठाही खंडित झाला. या विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने कोणतीही हानी झाली नसल्याचे सांगण्यात आले.