कळंबा परिसरात सार्वजनिक शौचालयांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:24 AM2021-03-17T04:24:28+5:302021-03-17T04:24:28+5:30

अमर पाटील कळंबा : कळंबा परिसरातील तपोवन, संभाजीनगर झोपडपट्टी, शासकीय मध्यवर्ती कारागृह, कात्यायनी कॉम्प्लेक्स, ...

Fall of public toilets in Kalamba area | कळंबा परिसरात सार्वजनिक शौचालयांची पडझड

कळंबा परिसरात सार्वजनिक शौचालयांची पडझड

Next

अमर पाटील

कळंबा : कळंबा परिसरातील तपोवन, संभाजीनगर झोपडपट्टी, शासकीय मध्यवर्ती कारागृह, कात्यायनी कॉम्प्लेक्स, निर्माण चौक, क्रेशेर चौक, जुना वाशीनाका या भागातील सार्वजनिक शौचालयांची अवस्था दयनीय झाली आहे. दुरुस्तीविना ही शौचालये मोडकळीस आली असून महानगरपालिकेने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

दाट नागरी वस्त्यांमध्ये असलेल्या भागात महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या समन्वयातून नागरिकांसाठी सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली आहेत. कित्येक वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या सार्वजनिक शौचालयांची आज मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून त्यांची दुरवस्था पाहण्यापलीकडे गेली आहे. या शौचालयांमध्ये स्वच्छतेचा अभाव असल्याने स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे कित्येक सार्वजनिक शौचालयांचे दरवाजे मोडकळीस आले आहेत. त्यामुळे अशा शौचालयांचा वापरच होत नसल्याचे चित्र आहे. शौचालयांच्या आवारातील फरशा निखळल्या आहेत. सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटारी विकसित करण्यात आल्या नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. संभाजीनगर झोपडपट्टीतील दोन हजार नागरिकांसाठी अवघी वीस शौचालये आहेत. तोकड्या शौचालयांमुळे या परिसरात रस्त्यावरच प्रातर्विधी केला जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रशासनाने आहे त्या शौचालयांची डागडुजी करावी, वाढत्या नागरी भागात नवीन शौचालयांची उभारणी करावी, अशी मागणी होत आहे.

चौकट :

औषध फवारणी... आठवतच नाही

सार्वजनिक शौचालयांच्या देखभालीची जबाबदारी महानगरपालिका कर्मचाऱ्यांची असली तरी, बहुतांश ठिकाणच्या शौचालयांची स्वच्छताच केली जात नाही. शौचालय परिसरात औषध फवारणी केल्याचे आठवत नसल्याची तक्रार अनेक नागरिक करतात. शौचालयालगत कचऱ्याचे साम्राज्य असल्याने दुर्गंधी पसरत आहे.

स्वच्छतागृहांच्या समस्या...

१) नागरी वस्त्यांच्या प्रमाणात तोकडी संख्या २) बंद पथदिवे, भटक्या कुत्र्यांचा उच्छाद ३) अनियमित औषध फवारणी ४) पाणी तुंबून डास, दुर्गंधीचे साम्राज्य ५) मोडकळीस आलेले दरवाजे, खिडक्या, उखडलेल्या फरशा ६) नियमित साफसफाईचा अभाव ७) शौचालयालगत कोंडाळे परिसरात दुर्गंधी.

काय करावे लागेल...

१) लोकसंख्येच्या प्रमाणात शौचालये वाढविण्याची गरज २) नियमितपणे देखभाल - दुरुस्ती ३) पुरेशी प्रकाशव्यवस्था ४) तुंबणाऱ्या पाण्याचे निर्गतिकरण व्हावे ५) नियमितपणे औषध फवारणी व साफसफाई ६) शौचालयालगतचे कोंडाळे अन्यत्र हलवावे

Web Title: Fall of public toilets in Kalamba area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.