Zero Shadow Day कोल्हापूरकरांनी अनुभवला, भरदुपारी सावली गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 05:28 PM2019-05-06T17:28:27+5:302019-05-06T17:30:51+5:30
भरदुपारी सावली गायब होण्याचा अनुभव कोल्हापूरकरांनी सोमवारी घेतला. ‘झिरो शॅडो डे’ (शून्य सावली दिवस) असल्याने दुपारी १२ वाजून २९ मिनिटांपासून ५२ सेकंदांपर्यंत सावली नाहीशी झाली. अनेकांनी सावली गायब झाल्याची छायाचित्रे, व्हिडिओ टिपून ती सोशल मीडियावरून शेअर केली. काहींनी व्हॉटस् अॅपच्या स्टेटस्वर ठेवली.
कोल्हापूर : भरदुपारी सावली गायब होण्याचा अनुभव कोल्हापूरकरांनी सोमवारी घेतला. ‘झिरो शॅडो डे’ (शून्य सावली दिवस) असल्याने दुपारी १२ वाजून २९ मिनिटांपासून ५२ सेकंदांपर्यंत सावली नाहीशी झाली. अनेकांनी सावली गायब झाल्याची छायाचित्रे, व्हिडिओ टिपून ती सोशल मीडियावरून शेअर केली. काहींनी व्हॉटस् अॅपच्या स्टेटस्वर ठेवली.
पृथ्वी सूर्याभोवती फिरता फिरता ती स्वत:भोवतीसुद्धा फिरते. ती स्वत:भोवती ज्या अक्षातून फिरते, तो अक्ष उभा नसून २३.५ अंशातून कललेला आहे; त्यामुळे सहा महिने सूर्य उत्तरेकडे सरकताना दिसतो, त्याला ‘उत्तरायण’ असे म्हणतात, तर सहा महिने तो दक्षिणेकडे सरकताना दिसतो त्याला ‘दक्षिणायन’ असे म्हणतात.
उत्तरेकडे सरकताना एकदा तर दक्षिणेकडे सरकताना एकदा असा वर्षातून दोनवेळा सूर्य बरोबर आपल्या डोक्यावर असतो. त्या वेळी तो आकाशाच्या घुमटाच्या अत्युच्य बिंदूवर असतो आणि त्याची किरणे त्या ठिकाणी लंबरूप पडतात, परिणामी कोणत्याही वस्तूची सावली बरोबर त्या वस्तूच्याच खाली पडते आणि दिसेनाशी होते. या घटनेला ‘झिरो शॅडो’ म्हणतात. त्या घटनेचा अनुभव कोल्हापूरकरांनी सोमवारी घेतला.
विविध मंदिरांची दीपमाळ, आपली वाहने, विद्युत खांब, आदींची सावली दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी गायब झाली. साधारणत: अर्ध्या मिनिटाने सावली पुन्हा पूर्वेकडे सरकू लागली.
दरम्यान, विवेकानंद महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विषयाचे प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली पदार्थविज्ञान विभागाचे विद्यार्थी सौरभ पाटील, सतीश पाटील, अनिकेत चिले यांनी अंबाबाई मंदिराच्या घाटी दरवाजाजवळील दीपमाळेजवळ नागरिकांना ‘शून्य सावली’ दिवसाची माहिती दिली.
रिटॉर्ड स्टँड, पॉर्इंटर, आदींची मांडणी करून त्या साहित्याची सावली कशी गायब झाली ते प्रात्यक्षिकांसह दाखविले. दीपमाळेची सावली नाहीशी झाल्याचा अनुभव तेथील लोकांनी घेतला. खगोलशास्त्राचे अभ्यासक डॉ. अविराज जत्राटकर यांनी सोळांकूर येथून, विशाल पंडित यांनी कागल, तर सुनील पाटील, गौतम जिरगे यांनी कोल्हापूरमधून विद्यार्थ्यांसमवेत ‘झिरो शॅडो डे’ची निरीक्षणे नोंदविली.
आता सहा आॅगस्टला संधी
महाराष्ट्रामध्ये निरनिराळ्या ठिकाणी सोमवारनंतर विविध दिवशी ‘शून्य सावली’चा अनुभव घेता येणार आहे. कोल्हापुरात पुन्हा दि. ६ आॅगस्ट रोजी ‘शून्य सावली’ दिवसाचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती प्रा. कारंजकर यांनी दिली.