‘ब्याडगी’च्या दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:14 AM2021-02-05T07:14:20+5:302021-02-05T07:14:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ऐन हंगामाच्या तोंडावर मिरचीने चांगलीच उसळी घेतली होती. मात्र या आठवड्यात दरात थोडी घसरण ...

Falling in ‘Badgy’ rates | ‘ब्याडगी’च्या दरात घसरण

‘ब्याडगी’च्या दरात घसरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ऐन हंगामाच्या तोंडावर मिरचीने चांगलीच उसळी घेतली होती. मात्र या आठवड्यात दरात थोडी घसरण झाली असून किरकोळ बाजारात ‘ब्याडगी’ २८० रुपयांपर्यंत खाली आली आहे. भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात फारशी चढउतार दिसत नाही. फळमार्केटमध्ये ‘माल्टा’, ‘बाेरे’, कलिंगडांची रेलचेल असून, द्राक्षांची आवक हळूहळू वाढू लागली आहे.

यंदा परतीचा पाऊस आणि त्यानंतर अवकाळीच्या झटक्याने मिरचीच्या पिकाला फटका बसला होता. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच मिरचीने ४०० रुपयांचा टप्पा गाठला होता. या आठवड्यात मात्र दरात हळूहळू घसरण होत असून किरकोळ बाजारात ‘ब्याडगी’चा दर २८० रुपये किलोपर्यंत आला आहे. येत्या आठ-दहा दिवसांत आवक वाढल्याने दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. चटणीसाठी लागणाऱ्या मसाल्याच्या दरात चढउतार नाही. तीळ १५०, जिरे २००, खोबरे १८० रुपये किलो आहे. कोथिंबिरीची मागणी वाढल्याने दरात थोडी वाढ झाली आहे. स्थानिक भाजीपाल्याची आवक वाढू लागल्याने वांगी, कोबी, टाेमॅटोच्या दरांत मोठी घसरण पाहावयास मिळते. किरकोळ बाजारात २० तर कोबी दहा रुपये किलो आहे. टोमॅटोही दहा रुपये किलोपर्यंतच राहिला आहे. दोडका, वाल, गवार, ओला वाटाणा, कारली, भेंडी, वरणा, घेवडा, ढब्बू या भाज्यांचे दर काहीसे स्थिर आहेत.

फळबाजारामध्ये मोसंबी, माल्टा, संत्री, द्राक्षे, चिक्कू, सफरचंदांची रेलचेल पाहावयास मिळते. द्राक्षांची आवक थोडी वाढली असली तरी अद्याप ती हिरवट आहेत. द्राक्षे काहीसी आंबट लागत असल्याने मागणी कमी आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात तीस रूपये किलो दर आहे. कलिंगडांची आवक वाढू लागली आहे. काळ्या पाठीच्या कलिंगडांनी बाजार फुलला असून मागणीही चांगली आहे.

डाळींच्या दरात वाढ दिसत नाही. हरभराडाळ ६५, तूरडाळ ११०, मूगडाळ १२०, भूग १००, मटकी १२० रुपये किलो आहे. शाबू ६०, तर साखर ३५ रुपयांवर स्थिर आहे.

कांदा-बटाटा स्थिर

बाजार समितीत रोज १६ हजार पिशव्या कांद्याचीआवक होत आहे. त्यामुळे दरात वाढ नसून घाऊक बाजारात सरासरी २५ रुपये कांदा आहे. बटाट्याचाही दरदाम स्थिर आहे.

फोटो ओळी : गेल्या आठवड्यात ग्राहकांना ठसका आणणाऱ्या ब्याडगी मिरचीच्या दरात थोडी घसरण झाली आहे. (फोटो-३१०१२०२१-कोल- बाजार) (छाया- आदित्य वेल्हाळ)

Web Title: Falling in ‘Badgy’ rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.