पाण्याच्या टाकीत पडून चिमुकल्याचा मृत्यू; कोल्हापुरातील लोणार वसाहतीत घडली दुर्देवी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 12:09 PM2024-10-07T12:09:20+5:302024-10-07T12:09:35+5:30
मामाकडे जायचा थांबला अन्..
कोल्हापूर : राजर्षी शाहू मार्केट यार्डपासून जवळ असलेल्या लोणार वसाहतीमधील सिमेंट पाइप कारखान्यात पाण्याच्या टाकीत पडून तैमूर शाहरूख मुल्ला (वय पावणेदोन वर्ष) याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. ६) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. वडिलांनी टाकीतून बाहेर काढून मुलास सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील शाहरूख मुल्ला हे लोणार वसाहतीत एका सिमेंट पाइप कारखान्यात वॉचमनचे काम करतात. कारखान्याच्या आवारातील एका खोलीत ते पत्नी आणि दोन लहान मुलांसह राहतात. रविवारी कारखान्याला सुटी होती. त्यांचा पावणेदोन वर्षांचा मोठा मुलगा तैमूर हा खोलीबाहेर खेळत होता, तर आई, वडिलांसह इतर नातेवाईक खोलीत होते.
काही वेळाने तैमूर बाहेर दिसत नसल्याने नातेवाइकांनी शोध सुरू केला. त्यावेळी तो पाण्याच्या टाकीत पडल्याचे लक्षात आले. तातडीने त्याला बाहेर काढून सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
मामाकडे जायचा थांबला अन्..
गेल्या सहा महिन्यांपासून तैमूर मामाकडे राहत होता. शुक्रवारी तो आजीसोबत आई-वडिलांकडे आला होता. शनिवारी रात्री ते परत जाणार होते. पण, रविवारी कामाला सुटी असल्याने वडिलांनी त्याला आणि त्याच्या आजीला थांबवून घेतले. शनिवारीच तो आजोळी गेला असता तर ही दुर्घटना टळली असती, असे म्हणत त्याच्या आईने सीपीआरच्या अपघात विभागासमोर हंबरडा फोडला.