कलिंगडच्या दरात घसरण, आवक वाढल्याचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 02:08 PM2019-05-27T14:08:15+5:302019-05-27T14:10:09+5:30
कलिंगडचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना दरात एकदमच घसरण सुरू झाली आहे. घाऊक बाजारात ४ ते १० रुपये दर राहिला असून आवक वाढल्याचा परिणाम दरावर दिसत आहे.
कोल्हापूर : कलिंगडचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना दरात एकदमच घसरण सुरू झाली आहे. घाऊक बाजारात ४ ते १० रुपये दर राहिला असून आवक वाढल्याचा परिणाम दरावर दिसत आहे.
यंदा उन्हाचा तडाखा फेब्रुवारीपासूनच जाणवू लागला. त्यामुळे फळांच्या मागणीत वाढ होत गेली. आंब्याच्या अगोदर कलिंगडची आवक सुरू झाली आणि मागणीही त्या पटीत राहिली. परिणामी दर चांगला मिळत गेला. आता कलिंगडचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. आंब्याची आवक वाढल्याने कलिंगडची मागणी घटली आहे.
यंदा एकही जोरदार वळीव पाऊस न झाल्याने हवेत कमालीचा उष्मा पाहावयास मिळत आहे. त्यामुळे कलिंगडला शेवटपर्यंत मागणी राहणार म्हणून माढा, पंढरपूर, कर्नाटकातील शेतकरी कलिंगड घेऊन कोल्हापूरबाजार समितीत येत आहेत.
तापमानात वाढ होत चालल्याने कलिंगडच्या दरातही तेजी येईल, असा आशा शेतकऱ्यांनी होती; पण ग्राहकांचा प्रतिसादच मिळत नाही. सगळेजण आंबा खरेदीमध्ये गुंतल्याने कलिंगडकडे अक्षरश: पाठ फिरवल्यासारखीच अवस्था आहे.
कोल्हापूर बाजार समितीत रोज हजाराहून अधिक कलिंगडांची आवक होते. सकाळी लिलावात ढीग लावले जातात. नगाच्या आकारानुसार ढीग लावले जातात. साधारणत: ५० ते ५०० रुपयांपर्यंत ढिगांची बोली होत आहे. सरासरी २०० रुपये ढिगाची किंमत होत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही.
उष्मा कायम असल्याने कलिंगडना चांगला दर मिळेल असे वाटत असल्याने गाडी भरून माल घेऊन आलो. पण येथे कवडीमोल दराने विक्री करावी लागत आहे. कष्ट व वाहतूक खर्चाचा ताळमेळच बसत नाही.
-औदुंबर रणदिवे (शेतकरी, भोसे-माढा)