टक्का घसरूनही ‘कोल्हापूर विभाग’ राज्यात दुसऱ्या स्थानी; मुलींची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 06:12 PM2019-06-08T18:12:41+5:302019-06-08T18:18:55+5:30
शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या दहावीचा निकाल शनिवारी आॅनलाईन जाहीर झाला. त्यामध्ये कोल्हापूर विभागाचा निकाल ८६.५८ टक्के लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत ७.३० टक्क्यांनी निकाल घटला असला, तरी सलग सातव्या वर्षी या विभागाने राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे स्थान कायम ठेवले आहे. भाषा आणि सामाजिक शास्त्रासाठीचे बंद झालेले अंतर्गत गुण, प्रश्नपत्रिकेच्या बदललेल्या स्वरूपामुळे गुणांचा फुगवटा यंदा कमी झाला.
कोल्हापूर : शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या दहावी परीक्षाचा निकाल शनिवारी आॅनलाईन जाहीर झाला. त्यामध्ये कोल्हापूर विभागाचा निकाल ८६.५८ टक्के लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत ७.३० टक्क्यांनी निकाल घटला असला, तरी सलग सातव्या वर्षी या विभागाने राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे स्थान कायम ठेवले आहे. भाषा आणि सामाजिक शास्त्रासाठीचे बंद झालेले अंतर्गत गुण, प्रश्नपत्रिकेच्या बदललेल्या स्वरूपामुळे गुणांचा फुगवटा यंदा कमी झाला.
‘बेस्ट आॅफ फाईव्ह’ सूत्रानुसार राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शनिवारी दुपारी एक वाजता आॅनलाईन निकाल जाहीर केला. त्यानंतर कोल्हापूर विभागाच्या निकालाची माहिती विभागीय सचिव सुरेश आवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विभागीय शिक्षण मंडळाचे लेखाधिकारी एस. एल. रेणके, प्रभारी सहायक सचिव एन. बी. पवार, साताऱ्याच्या उपशिक्षणाधिकारी शबनम मुजावर, आदी उपस्थित होते.
या विभागामध्ये ८८.८३ टक्क्यांसह कोल्हापूर जिल्ह्याने सलग पाचव्या वर्षी आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. सातारा जिल्हा ८६.२३ टक्क्यांनी द्वितीय, तर सांगली जिल्हा ८३.८२ टक्क्यांसह तृतीय क्रमांकावर आहे. विभागात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा ८.५८ टक्क्यांनी अधिक आहे.
या वर्षी कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील एकूण २२६७ शाळांतील १,३९,७२८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यांतील १,२०,९७६ जण उत्तीर्ण झाले. त्यामध्ये ५८१०६ मुली उत्तीर्ण झाल्या असून, त्यांचे प्रमाण ९१.२५ टक्के आहे. ६२,८७० मुले उत्तीर्ण झाली आहेत. त्यांचे प्रमाण ८२.६७ टक्के आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील ५००६९ विद्यार्थी, साताऱ्यामधील ३६७६१ आणि सांगलीतील ३४१४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुनर्प्रविष्ट विद्यार्थ्यांचा निकाल २८.९३ टक्के लागला असल्याची माहिती सचिव आवारी यांनी दिली. दरम्यान, यशस्वी विद्यार्थ्यांवर शिक्षक, कुटुंबीय, नातेवाईक, सुहृद, मित्र-मैत्रिणींनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
निकालाची राज्यभरातील टक्केवारी कमी झाली आहे. टक्केवारीचे प्रमाण घटले असले, तरी कोल्हापूर विभागाचे राज्यातील द्वितीय क्रमांकावरील स्थान यावर्षी कायम राहिले आहे. गेल्या वर्षीपर्यंत भाषा, सामाजिकशास्त्रे या विषयांना अंतर्गत २० गुण दिले जात होते. यावर्षी ते बंद करण्यात आले. केवळ गणित आणि विज्ञान-तंत्रज्ञान विषयांसाठी हे गुण देण्यात आले. बंद झालेले अंतर्गत गुण आणि प्रश्नपत्रिकेच्या बदललेल्या स्वरूपांमुळे गुणांची टक्केवारी कमी झाल्याची शक्यता आहे.
- सुरेश आवारी,
सचिव, कोल्हापूर विभाग
२६ हजार विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण
या विभागातील एकूण २३,६०९ विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त २० इतके सवलतीचे वाढीव गुण देण्यात आले. त्यात चित्रकला (२३,६०९), स्काउट-गाईड (१५), खेळाडू (२१६३) आणि दिव्यांग विद्यार्थी (५०७) यांचा समावेश आहे.
जिल्हानिहाय निकाल
- कोल्हापूर : ८८.८३ टक्के
- सातारा : ८६.२३ टक्के
- सांगली : ८३.८२ टक्के