भाजीपाल्याच्या दरात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:17 AM2021-06-21T04:17:03+5:302021-06-21T04:17:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापुरात भाजीपाल्याच्या दरात काहीसी घसरण झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक स्थिर असली तरी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापुरात भाजीपाल्याच्या दरात काहीसी घसरण झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक स्थिर असली तरी पावसामुळे भाजीपाल्याचा उठाव होत नसल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. कोथिंबीरचा दर कमी झाला असला तरी मेथी मात्र तेजीत आहे. किरकोळ बाजारात वीस रुपये पेंढी आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व लॉकडाऊनमुळे अगोदरच भाजीपाल्याचे मार्केट अस्थिर झाले आहे. हॉटेल, लग्न समारंभासह आठवडी बाजार बंद असल्याने भाजीपाल्याचा उठाव होत नाही. त्यामुळे कोल्हापूर बाजार समितीत भाजीपाला शिल्लक राहत होता. या आठवड्यात पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढले आहे. त्याचा परिणाम भाजीपाल्यावर झाला आहे. सरासरी आवक कायम असली तरी दरात मात्र काहीसी घसरण दिसत आहे. पावसाचा तडाखा जोरदार असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. त्याचा थोडाफार परिणामही भाजीपाल्याचा उठाव व दरावर झाला आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत कोबी, टोमॅटो, ढब्बू, कारली, भेंडी, दोडक्याची आवक चांगली राहिली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरात मात्र घसरण दिसत आहे. घाऊक बाजारात गवारीचा दर किलोमागे पंधरा रुपयांनी कमी झाला आहे. किरकोळ बाजारात वांगी ८० ते १०० रुपये किलो पर्यंत गेली होती. मात्र, या आठवड्यात ती ६० रुपयांपर्यंत आली आहेत. कारल्याच्या दरातही किलोमागे दहा रुपयांची घसरण झाली आहे. वरणाचा दर कायमच चढा राहिला असला तरी या आठवड्यात मात्र तो ४५ रुपये किलोपर्यंत खाली आला.
पॉप कॉर्नची आवक वाढली
पावसाळी वातावरणामुळे पॉपकॉर्नच्या मागणीत वाढ झाली आहे. आवकही चांगली असून, बाजार समितीत रोज पाच हजार कणसांची आवक होत आहे. साधारणत: दोन कणीस असा घाऊक दर राहिला आहे.
आंब्याची आवक घटली
मद्रास हापूस व लालबागच्या आंब्याची आवक सध्या बाजारात सुरू आहे. मात्र, गेल्या आठवड्याच्या तुलनेत दोन्ही आंब्यांची आवक एकदम कमी झाली आहे. मात्र, तोतापुरीची आवक वाढली असून, दर मात्र तेजीत आहे.