परदेशी चलन दुप्पट करण्याचे आमिष दाखवून फसवणुक: केनियन गुन्हेगारास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 12:55 AM2019-02-05T00:55:14+5:302019-02-05T00:55:44+5:30

इचलकरंजीतील बांधकाम व्यावसायिकास परदेशी चलन दुप्पट करण्याचे आमिष दाखवून ६३ लाखांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या केनियन नागरिकास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी

False fraud by doubling foreign currency: Kenyan criminals arrested | परदेशी चलन दुप्पट करण्याचे आमिष दाखवून फसवणुक: केनियन गुन्हेगारास अटक

परदेशी चलन दुप्पट करण्याचे आमिष दाखवून फसवणुक: केनियन गुन्हेगारास अटक

googlenewsNext
ठळक मुद्देबांधकाम व्यावसायिकाकडे ६३ लाखांची मागणी

कोल्हापूर : इचलकरंजीतील बांधकाम व्यावसायिकास परदेशी चलन दुप्पट करण्याचे आमिष दाखवून ६३ लाखांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या केनियन नागरिकास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शिताफीने छापा टाकून मुसक्या आवळल्या. मुथाय इसाह (वय ४५, रा. कॉलेज रोड, युनायटेड नेशन अ‍ॅव्हेन्यूजवळ, नैरोबी, केनिया) असे संशयिताचे नाव आहे.

त्याच्याकडून भारतीय चलनातील १३ हजार रुपये, २०० अमेरिकन डॉलर, २०० व ३०० युरोज असे परकीय चलन, २२ कागदाचे बंडलामध्ये प्रत्येकी १०० युरोजचे आकाराचे कागद असे एकूण २ हजार २०० कागद, केमिकल्स, चिकट टेप, गम, हॅण्डग्लोज, कापूस, मास्क, पाच मोबाईल, आदी साहित्य जप्त केले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

संशयित मुथाय इसाह हा चार महिन्यांपूर्वी मुंबईत आला. त्याने सोशल मीडियावरून मुंबई, पुणे, कोल्हापूर, इचलकरंजी परिसरात ज्यांचे आर्थिक व्यवहार मोठे आहेत, त्यांची यादी तयार केली. त्यानंतर तो कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये चार दिवसांपूर्वी उतरला. त्याने बांधकाम व्यावसायिक अभिजित हंबीरराव खराडे (वय २९, रा. कुडचे मळा, तीन बत्ती चौक, इचलकरंजी) यांची भेट घेतली. आपण मोठ्या रकमेची व्यवसायामध्ये गुंतवणूक करणार असल्याचा बहाणा करून त्यांच्याशी जवळीक साधली. खराडे यांना आपलेकडे स्वीस बँकेकडून मोठ्या प्रमाणात अदृश स्वरूपात असणारे काळे रंगाचे कागदी डॉलर भारतीय चलनानुसार मोठ्या प्रमाणात आहेत. तसा पैसा मी घेऊन आलो आहे; परंतु परदेशी पातळीवर चलन सुरक्षितता म्हणून ते काळे करून दिले जाते. कागदी चलनाचे बंडलामधील काळा कागद काढून हातचालखीने बरोबर असलेल्या केमिकलमध्ये धुवून ५०० युरोज हे चलन दाखवून ते खराडे यांच्याकडे दिले. त्याचे भारतीय चलनामध्ये रूपांतरित करून खराडे यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आपल्याकडे २० मिलियन युरोज असून, त्याची भारतीय चलनाप्रमाणे १६ कोटी रुपये किंमत होते, असे सांगून ते युरोजचे रूपांतर करावयाचे झाल्यास त्यासाठी लागणारे केमिकल व अन्य साहित्याचा खर्च ६३ लाख रुपये येणार आहे.

त्याकरिता मला पैशाची आवश्यकता असून, तुम्ही दिल्यास त्या मोबदल्यात ३ कोटी २० लाख रुपये देऊन बिझनेसमध्ये गुंतवणूक करीन असे सांगितले. इसाह याच्या सांगण्यावर खराडे यांना संशय आला. त्यांनी याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

साडेआठ कोटींचा गंडा घालण्याचा कट
पोलिसांनी त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली असता तो पोपटासारखा बोलू लागला. त्याला मराठीही बोलता येत असल्याने त्याचे मुंबईमध्ये अनेक महिन्यांपासून वास्तव्य असल्याचे निदर्शनास आले. त्याच्याजवळ मिळालेल्या यादीमध्ये पन्नासपेक्षा जास्त व्यापारी लोकांची नावे होती. या सर्वांशी तो संपर्क साधून बनावट परदेशी नोटा त्यांच्या गळ्यात मारून सुमारे ८ कोटी ३६ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक करण्याचा त्याचा कट होता.
रडण्याचे नाटक

इसाह उतरलेल्या हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी तो खराडे यांच्याकडून पैसे घेऊन पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी रूममध्येच खाक्या दाखवताच त्याने फसवणुकीच्या प्लॅनची कबुली दिली. रूममध्येच बनावट परदेशी चलनी नोटांचे कागद, केमिकलसह अन्य साहित्य असलेली पेटी पोलिसांनी जप्त केली. प्रसारमाध्यमांचे छायाचित्रकार फोटो काढत असताना तो चेहरा लपवित होता. त्याच ठिकाणी त्याने रडण्याचे नाटक केले.


परदेशी गुन्हेगार मुथाय इसाह याच्या ताब्यातून पोलिसांनी जप्त केलेल्या परदेशी चलनाच्या बनावट नोटा व साहित्य.

Web Title: False fraud by doubling foreign currency: Kenyan criminals arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.