Kolhapur- देवर्डे येथे 'एक कुळ, एक गणपती' संकल्पनेतून कुटुंबे एकत्रित; एकोपा, आपुलकी वाढण्यास मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 04:00 PM2023-09-23T16:00:05+5:302023-09-23T16:02:11+5:30
सदाशिव मोरे आजरा : विविध कारणांनी लुप्त होत चाललेली एकत्र कुटूंब पद्धती, विरळ होत चाललेले नात्यातील बंध आणि त्यामुळे ...
सदाशिव मोरे
आजरा : विविध कारणांनी लुप्त होत चाललेली एकत्र कुटूंब पद्धती, विरळ होत चाललेले नात्यातील बंध आणि त्यामुळे प्रेम, आपुलकी, आदर या मानवी भावनांची संवेदना कमी होताना होत असतानाच आजरा तालुक्यातील देवर्डे येथे " एक कुळ एक गणपती" ही संकल्पना सुरू केली आहे. विखुरलेल्या सर्व कुटुंबियांना एकत्र आणून एकाच मूर्तीच्या साक्षीने गणेशोत्सव सामुदायिकरीत्या साजरा केला जावा. गणेशाच्या साक्षीने कुटूंबामधील एकोपा वाढीस लागावा या हेतूने पाटील कुळातील नागरिक एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात.
प्रत्येक कुटुंबाचा वेगळा आचार-विचार, वेगळे राहणीमान, वेगळी आचारसंहिता यामुळे कुटुंबाकुटुंबामध्ये हेवे दावे वाढले. याला आवर घालण्यासाठी देवर्डेचे सरपंच जीएम पाटील यांनी आपल्या पाटील कुळातील सर्व कुटुंबियांना एकत्र केले व एक कुळ एक गणपती ही संकल्पना मांडली. त्याला सर्व वडीलधाऱ्या व्यक्तींनी एकमुखी पाठिंबा दिला.
सर्वजण पूजा, प्रसाद, जेवण यासाठी एकत्र येतात. झिम्मा - फुगडी, पाककला, विविध खेळ, गणपती समोरील सामूहिक गाणी यासह अंगत पंगत रंगली आहे .सकाळपासून रात्रीपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम होतात. सुखदुःखाची देवाण-घेवाण होत आहे. आज पाटील कुळाचा एकच गणपती व उत्सव धुमधडाक्यात सुरु आहे.
या संकल्पनेमुळे उत्सवातील फटाके, आतषबाजी कमी होवून ध्वनी व हवा प्रदूषणाला ही मर्यादा घालता आली. विसर्जीत होणारे निर्माल्य व मुर्तींमुळे पाणी प्रदूषण ही नक्कीच कमी होणार आहे. सर्व कुटुंबे एकत्र आल्यामुळे नातेसंबंध अधिक घटृ होण्यास मदत होणार आहे - जी.एम. पाटील सरपंच देवर्डे ( ता.आजरा )
गणेशोत्सव एकत्र साजरा केल्यामुळे एकत्र कुटुंब पद्धतीला बळ मिळणार आहे. वेळ, पैसा व श्रम वाचणार असून भाऊबंदकीचे वाद कमी होण्यास मदत होणार आहे. - दिनेश शेटे - कृषी अधिकारी पंचायत समिती आजरा.