संघाच्या पैशांतून स्वतासह कुटुंबीयांचा विमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:25 AM2021-07-29T04:25:27+5:302021-07-29T04:25:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाच्या माजी संचालकांनी संघाच्या पैशांतून स्वत:सह आपल्या कुटुंबीयांचा विमा उतरवल्याची धक्कादायक माहिती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाच्या माजी संचालकांनी संघाच्या पैशांतून स्वत:सह आपल्या कुटुंबीयांचा विमा उतरवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैद्यकीय विम्यापोटी तब्बल ३ लाख ८७ हजार रुपये संघावर खर्च टाकला आहे. प्रशासक मंडळ कार्यरत झाल्यापासून अनेक कारनामे निदर्शनास येत आहेत.
शेतकरी संघाच्या संचालक मंडळाच्या भोंगळ कारभाराचे अनेक प्रकरणे गेल्या चार-पाच वर्षात उघडकीस आली. तीन संचालकांनी राजीनामे दिल्याने संचालक मंडळ अल्पमतात आले होते. त्यामुळे संघावर दोन सदस्यीय प्रशासक मंडळ कार्यरत झाले. प्रशासकांनी पदभार स्वीकारल्यानंतर संघाच्या कारभाराला शिस्त लावण्यास सुरुवात केली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन संघाचा रुतलेला बैल बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे. प्रशासक मंडळाने संघातील चुकीच्या गोष्टींवर निर्बंध आणण्यास सुरुवात केली आहे. उधारीसह इतर अनेक बाबीं आक्षेपार्ह आहेत. मात्र संघाच्या पैशातून माजी संचालकांनी चक्क आपल्यासह कुटुंबीयांचा वैद्यकीय विमा उतरवला आहे. त्यासाठी संघावर ३ लाख ८७ हजार खर्च टाकला आहे.
माजी संचालकांनी मोठ्या प्रमाणात नोकरभरती केली आहे. नोकर पगारावर महिन्याला दहा लाख रुपये खर्च होतो. त्यामुळे प्रशासक मंडळाने ६० हंगामी कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा बँकेच्या कॅश क्रेडिटपोटी ४ लाखाचे व्याज
संघाने जिल्हा बँकेकडून पाच कोटी कॅश क्रेडिट घेतले त्यातील चार कोटी वापरले. त्याच्या व्याजापोटी महिन्याला ४ लाख रुपये खर्ची पडत आहेत.
साडेतीन कोटींची कामगार देणी
संघाचे भाडे करार चुकीच्या पद्धतीने झाल्याने नुकसान झाले आहे. न्यायालयीन खर्चही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यातच कामगारांची साडेतीन कोटींची देणी आहेत.