आसुर्लेत सख्ख्या भावाचा खून कौटुंबिक वाद : भावाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 11:05 PM2019-03-30T23:05:36+5:302019-03-30T23:07:41+5:30
आसुर्ले (ता. पन्हाळा) येथे कौटुंबिक वादातून सख्ख्या थोरल्या भावाचा लाकडी दांडके आणि दगड डोक्यात घालून निर्घृण खून केल्याच्या घटनेने शनिवारी जिल्ह्यात खळबळ उडाली. दिलीप गणपती पाटील (वय ५५) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पन्हाळा पोलिसांनी
कोल्हापूर : आसुर्ले (ता. पन्हाळा) येथे कौटुंबिक वादातून सख्ख्या थोरल्या भावाचा लाकडी दांडके आणि दगड डोक्यात घालून निर्घृण खून केल्याच्या घटनेने शनिवारी जिल्ह्यात खळबळ उडाली. दिलीप गणपती पाटील (वय ५५) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पन्हाळा पोलिसांनी संशयित भाऊ प्रकाश गणपती पाटील (४८) याला अटक केली.
ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आसुर्लेत खून झाल्याचे वृत्त जिल्ह्यात पसरताच खळबळ उडाली. खुनाचे नेमके कारण लवकर स्पष्ट होत नसल्याने राजकीय वास आहे काय, या भीतीने दक्षता म्हणून कोल्हापुरातून राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तत्काळ आसुर्लेकडे रवाना करण्यात आली. गावात सशस्त्र पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
दिलीप पाटील हे शेती करीत होते. त्यांच्या पत्नीचे २००८ मध्ये आजाराने निधन झाले आहे. त्यांना मुलगा अजित व विवाहित मुलगी आहे. दिलीप स्वतंत्र राहत होते. ते व्यसनाच्या आहारी गेले होते. त्यांचा धाकटा भाऊ प्रकाश त्यांच्या समोरच स्वतंत्रपणे राहत होता. तो शेती करतो. त्याचे लग्न झाले नव्हते. वडील दारूच्या आहारी गेल्याने मुलगा अजित चुलता प्रकाशजवळच राहतो. दिलीप हे स्वत:च जेवण करून खात होते. नेहमी दारू पिऊन दोघा भावांमध्ये वादावादी होत होती. नेहमीप्रमाणे दिलीप शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास दारू पिऊन आले. त्यांची व भाऊ प्रकाशची पुन्हा किरकोळ वादातून हाणामारी झाली. नेहमीचा वाद असल्याने शेजारील लोकांनी लक्ष दिले नाही. प्रकाशने लाकडी दांडके आणि दगड डोक्यात घालून भाऊ दिलीप यांचा खून केला. कोल्हापुरातील पोलीस मुख्यालयात गुन्हे आढावा बैठक सुरू होती. खुनाची माहिती मिळताच शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावर मृतदेहाचा पंचनामा करून रक्ताने माखलेला दगड आणि लाकडी दांडके ताब्यात घेतले. संशयित भाऊ प्रकाश याला पोलिसांनंी जाग्यावरच अटक केली. या घटनेने आसुर्लेत खळबळ उडाली. निवडणुकीचे वारे असल्याने दक्षता म्हणून कोल्हापुरातून राज्य राखीव दलाचे सशस्त्र जवान तैनात करण्यात आले. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी रात्री उशिरा गावात भेट देऊन माहिती घेतली.