विमानतळाच्या संरक्षक भिंतीची निविदा प्रसिद्ध
By Admin | Published: August 26, 2016 01:03 AM2016-08-26T01:03:46+5:302016-08-26T01:11:40+5:30
१६ कोटींचे काम : १८ महिन्यांची मुदत
कोल्हापूर : जिल्ह्याच्या विकासातील केंद्रबिंदू ठरणाऱ्या उजळाईवाडी विमानतळाला आता चांगले दिवस येत आहेत. या विमानतळाला सेवासुविधा उपलब्ध करून देण्याबाबत नुकताच मुंबईत करार झाला असतानाच गुरुवारी १६ कोटी रुपये खर्च करून विमानतळाभोवती संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली. येत्या काही दिवसांत सुरू होणारे संरक्षक भिंतीचे काम १८ महिन्यांत पूर्ण करण्याची अट घालण्यात आलेली आहे.
खासदार धनंजय महाडिक यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांची भेट घेऊन कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टीसाठी ५० कोटी, तर संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी २० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. ही दोन्ही कामे मार्गी लागल्यास विमानतळ विकसनाची प्रक्रिया आणि प्रत्यक्षात विमानसेवा सुरू होण्यातील महत्त्वाचे टप्पे पार पडतील, याकडे महाडिक यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले होते. त्यावेळी महिन्यात या कामांसाठीचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मंत्री राजू यांनी दोन्ही कामांसाठी ७० कोटींचा निधी मंजूर केला. मंत्री राजू यांनी प्रशासकीय पातळीवर या कामाला गती दिली आणि प्रत्यक्ष निधीही उपलब्ध करून दिला.
दोन्ही कामांपैकी संरक्षक भिंत बांधकामाची १६ कोटींची निविदा गुरुवारी प्रसिद्ध झाली. येत्या काही दिवसांत विमानतळाच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू होईल. त्यामुळे कोल्हापूरची विमानसेवा
सुरू होण्यातील एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे, असे खासदार महाडिक यांनी एका पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)