आरोग्यदूत हरपला, डॉ. घन:श्याम वैद्य यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 06:01 PM2024-04-16T18:01:24+5:302024-04-16T18:01:54+5:30
राम मगदूम गडहिंग्लज (जि. कोल्हापूर ) : घटप्रभा (ता.गोकाक, जि. बेळगाव ) येथील कर्नाटक आरोग्य धामचे ( कर्नाटक हेल्थ ...
राम मगदूम
गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) : घटप्रभा (ता.गोकाक, जि.बेळगाव) येथील कर्नाटक आरोग्य धामचे (कर्नाटक हेल्थ इन्स्टिट्यूट) मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मुख्य वैद्यकीय अधिकारी, प्रसिद्ध शल्यविशारद डॉ. घन:श्याम माधवराव वैद्य (वय ६७) यांचे सोमवारी (दि.१५) हृदयविकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ.स्वाती, मुलगे डॉ. राहुल व डॉ. रोहित, बहिण डॉ. अलकनंदा, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
गेल्या ४ वर्षांपासून ते मूत्रपिंडाच्याविकाराने त्रस्त होते. सोमवारी सकाळी रक्तदाब कमी झाल्याने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सायंकाळी घटप्रभा शहरात सजवलेल्या उघड्या जीपमधून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर 'केएचआय'च्या आवारातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल शिरगावकर, माजी खासदार अमरसिंह पाटील, आदींसह सीमाभागातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
डॉ.घनश्याम यांनी तब्बल ४० वर्षे वैद्यकीयसेवा बजावली. दरम्यान, २०१४ ते २०२३ अखेर त्यांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी व खजिनदारपदाची धुरा सांभाळली. वैद्यकीय उपचारासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक उपकरणांचा वापर करण्याबरोबरच परिचारिक महाविद्यालयही त्यांनी सुरू केले. त्यामुळे परिसरातील हजारो ग्रामीण युवक- युवतींना देश- विदेशात रोजगार आणि व्यवसायाची संधी मिळाली.
दुसऱ्या पिढीतील दुवा निखळला!
१९२९ मध्ये अमेरिकेत वैद्यकीय शिक्षण घेऊनही बेळगावच्या डॉ.आर.जी.कोकटनूर यांनी घटप्रभेच्या माळावर 'केएचआय'ची स्थापना केली.त्यानंतर डॉ.माधवराव वैद्य यांनी त्याचा विस्तार केला.त्यांचे सुपुत्र डॉ.किरण व डॉ.घन:श्याम यांनी रुग्णालयाच्या वाटचालीत मोलाचे योगदान दिले.घटप्रभा नदीच्याकाठी साकारलेले हे सेवाभावी रुग्णालय आरोग्यदायी वातावरण आणि माफक दरातील उपचारांमुळे 'मिरजेच्या वानलेस हॉस्पिटल'प्रमाणे सीमाभागात प्रसिद्ध आहे.डॉ.घन:श्याम यांच्या निधनाने रुग्णालयाच्या जडणघडणीतील दुसऱ्या पिढीतील महत्त्वाचा दुवा निखळला.