रोषणाईच्या ‘फॅन्सी’ फटाक्यांना पसंती
By admin | Published: November 9, 2015 11:45 PM2015-11-09T23:45:21+5:302015-11-10T00:01:24+5:30
पर्यावरणपूरक दिवाळी : कमी आवाज, आकर्षक फटाक्यांचे अनेक पर्याय बाजारात
कोल्हापूर : दिवाळी आणि फटाके हे अतुट समीकरण आहे; पण यावेळी कोल्हापूरकरांनी हे समीकरण नव्या पद्धतीने कायम राखण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहेत. विविध सामाजिक संस्था, शाळांमध्ये केलेल्या ध्वनी, हवा प्रदूषणाबाबत केलेल्या जागृतीची जाणीव ठेवून त्यांच्याकडून मोठ्या आवाजाचे फटाके टाळून रोषणाई करणाऱ्या ‘फॅन्सी’ फटाक्यांना पसंती दिली जात आहे.कोल्हापूर जिल्हा फटाके उत्पादक व विक्रेता संघटनेच्या माहितीनुसार जिल्ह्यात अधिकृत १२० उत्पादक व विक्रेते आणि तात्पुरत्या स्वरूपातील सुमारे १२०० लहान स्टॉलधारक दिवाळीसाठी सज्ज झाले आहेत. यावर्षी ध्वनी व हवा प्रदूषण टाळणाऱ्या फटाका खरेदीवर लोकांचा भर आहे. जाँईट, अॅटम बॉम्ब, एक हजार व पाच हजारच्या माळा अशा मोठ्या आवाजाच्या फटाक्यांऐवजी लॅटर्न बलून, डब्बल बार, चिटचॅट, भुईचक्कर, फुलबाजे, पाऊस, मल्टिशॉट अशा केवळ रंगीबेरंगी ‘फॅन्सी’ फटाक्यांना अधिक मागणी आहे. त्यात एरियल कलर आऊट, पाऊस, आदींचा समावेश आहे. शिवाय बिन आवाजाचे, कमी प्रदूषण करणारे; पण आकर्षक व रंगीबेरंगी रोषणाई करणारे १६ ते पाचशे शॉटस् फटाके २५० रुपयांपासून सात हजारांपर्यंत उपलब्ध आहेत. पर्यावरणपूरक दिवाळीच्या दिशेने कोल्हापूरकरांनी पाऊल टाकले आहे.
दिवाळीत लोक पहिल्यांदा फराळ आणि कपड्यांना प्राधान्य देतात. त्यानंतर फटाक्यांकडे ते वळतात. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून फटाके खरेदीसाठी लोक येऊ लागले आहेत. येत्या दोन दिवसांत त्यांचे प्रमाण वाढेल. यंदा लोकांची रोषणाई करणाऱ्या ‘फॅन्सी’ फटाक्यांना अधिकतर पसंती आहे. दरात एक ते दोन टक्क्यांची वाढ झाली आहे.
- प्रकाश मिसाळ,
फटाके विक्रेते