आदेशावर श्वानांच्या शानदार कसरती; कोल्हापुरात पोलिस कर्तव्य मेळाव्यात रंगली स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 04:44 PM2024-10-17T16:44:43+5:302024-10-17T16:46:16+5:30
मेळाव्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण येथून १२० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला
कोल्हापूर : परिक्षेत्रातील स्पर्धकांच्या १९ व्या पोलिस कर्तव्य मेळाव्याचे बुधवारी सकाळी पोलिस मुख्यालयात अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते उद्घाटन झाले. गुन्ह्यांच्या तपासांत महत्त्वाचे योगदान असलेले श्वानपथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक, ठसे तज्ज्ञ, संगणक तज्ज्ञ अशा विविध घटकांतील स्पर्धकांनी पोलिस कर्तव्य मेळाव्यात कौशल्याचे सादरीकरण केले. पोलिसांच्या आदेशावर विविध कसरती करणाऱ्या श्वानांनी उपस्थितांची मने जिंकली.
फिर्याद दाखल करून घेण्यापासून ते घटनास्थळाचा पंचनामा, पुराव्यांचा शोध, योग्य दिशेने गुन्ह्यांचा तपास करणे, तातडीने आरोपींना पकडणे, त्यांच्याकडील मुद्देमाल हस्तगत करणे, आरोपपत्र दाखल करण्याच्या कामात पोलिस विविध घटकांचा समावेश असतो. श्वान पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक, ठसे तज्ज्ञ, संगणक तज्ज्ञ, पोलिस फोटोग्राफी, चित्रीकरण करणा-या पथकांचे ज्ञान अद्ययावत आणि शास्त्रीय असावे यासाठी पोलिस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन केले जाते. विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या सूचनेनुसार बुधवारी सकाळी पोलिस मुख्यालयात मेळाव्याची सुरुवात झाली.
या मेळाव्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण येथून १२० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. उद्घाटनानंतर झालेल्या श्वानपथकांच्या स्पर्धेत श्वानांनी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कसरती करून त्यांचे कौशल्य दाखविले. शालेय विद्यार्थ्यांनीही या स्पर्धेचा आनंद घेतला. स्पर्धेचा समारोप शुक्रवारी (दि. १८) सायंकाळी होणार आहे. उद्घाटन समारंभास अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, निकेश खाटमोडे-पाटील, उपअधीक्षक प्रिया पाटील (गृह), सुजितकुमार क्षीरसागर, आप्पासो पवार, निरीक्षक रवींद्र कळमकर, आदी उपस्थित होते.