आनंदाची विलक्षण कथा ‘जंगल खजिन्याचा शोध’ ; कोल्हापूरचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 01:24 AM2019-06-15T01:24:27+5:302019-06-15T01:25:03+5:30
‘जंगल खजिन्याचा शोध’ ही बालकादंबरी असून, एका बालचमूने जंगलातील मौल्यवान औषधी वनस्पतींची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करणारी ही एक उत्कंठावर्धक कथा आहे. या कादंबरीत छोट्या मित्रांचे निव्वळ साहसच नाही, तर निसर्गाच्या सान्निध्यात मिळणाºया मनमुराद आनंदाची ही विलक्षण कथा
डॉ. प्रकाश मुंज ।
कोल्हापूर : ‘जंगल खजिन्याचा शोध’ ही बालकादंबरी असून, एका बालचमूने जंगलातील मौल्यवान औषधी वनस्पतींची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करणारी ही एक उत्कंठावर्धक कथा आहे. या कादंबरीत छोट्या मित्रांचे निव्वळ साहसच नाही, तर निसर्गाच्या सान्निध्यात मिळणाºया मनमुराद आनंदाची ही विलक्षण कथा असल्याची प्रतिक्रिया बालसाहित्यकार सलीम सरदार मुल्ला यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
साहित्य अकादमीच्यावतीने २०१९ चा ‘बाल साहित्य पुरस्कार’ शुक्रवारी जाहीर करण्यात आला. यात मराठी भाषेतील ‘बाल साहित्य पुरस्कार’ तळंदगे (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील सलीम सरदार मुल्ला यांच्या ‘जंगल खजिन्याचा शोध’ या बालकादंबरीस जाहीर करण्यात आला. पुण्यातील दर्या प्रकाशनच्यावतीने २०१४ मध्ये ही कादंबरी प्रकाशित करण्यात आली आहे.
यानिमित्ताने सलीम मुल्ला यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी या पुरस्कारबद्दल आनंद व्यक्त करून बालसाहित्याप्रती आपली आणखी जबाबदारी वाढली असल्याची भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. पुरस्कारप्राप्त पुस्तकाविषयी ते म्हणाले की, जेबू आणि त्याचे छोटे मित्र डोंगर-कपारीतून मनसोक्त भटकतात.
पशुपक्ष्यांचे आवाज, त्यांच्या पावलांचे ठसे, जलचर , कीटक, झाडे-वनस्पती, पाना-फुलांचा गंध, त्यांचे औषधी उपयोग, दगड-मातीचे रंग व आकार अशा अनेक वैविध्यपूर्ण गोष्टींचे बारकाईने निरीक्षण करतात. त्यामुळे जंगलच्या आगळ्यावेगळ्या खजिन्याची छोट्यांना ओळख होत जाते आणि यातून मौल्यवान औषधी वनस्पतींची तस्करी करणाºया टोळीचा पर्दाफाश होतो. यामुळेच लहान मुलांच्या दृष्टीने ही कादंबरी उत्कंठावर्धक आणि वाचनीय ठरली आहे.
लेखकाविषयी.... सलीम सरदार मुल्ला
मूळ गाव : तळंदगे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर. सध्या आजरा येथे राहतात.
शिक्षण : अभियंता पदविका आणि इंटेरियल डिजाइन कोर्स, दळवीज् आटर्स (कोल्हापूर) येथे इंटेरियल डिजाइन शिक्षक म्हणून शिकविले.
वनविभागात वनरक्षक या पदावर २००६ पासून कडगाव (ता. भुदरगड) येथे कार्यरत, १९८८ पासून सातत्याने वन्यप्राणी, वन्यपक्षी, निसर्गविषयक विविध पत्रिकांमधून लेखन. ‘लोकमत’मध्येही लेखन पर्यावरण जागृती व प्रबोधनविषयक अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये व्याख्याने.
बालसाहित्यविश्व
१. अवलिया : ललित संग्रह, २००० मध्ये प्रकाशित
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून प्रकाशित.
२ . जंगल खजिन्याचा शोध : बालकादंबरी २०१४ मध्ये पुण्यातील दर्या प्रकाशनद्वारा प्रकाशित
३. ऋतूफेरा - ललित लेख संग्रह २०१८ मध्ये प्रकाशित
४. पेणा आणि चिकोटी : बालकादंबरी, पॉप्युलर प्रकाशनकडून प्रकाशनाच्या मार्गावर आहे.
५. अजबाईतून उतराई : बालकादंबरी प्रकाशनाच्या मार्गावर आहे.
मुलांवर निसर्ग संस्कार होण्यासाठी निसर्ग सान्निध्यात राहिले पाहिजे. निसर्गाच्या प्रत्येक अप्रूपातून हरेक ऋतूच्या नवलाईची जादू शोधता येते. पाखरांच्या कलकलाटाची लडिवाळ बोली समजून घ्यायला हवी. किडे, फुलपाखरे, पशु-पक्षी या साऱ्यांच्या हरेक हरकतींचा मागमूस घेता आला पाहिजे. तर निसर्गाच्या निर्मितीमागे ईश्वराचे नेमके प्रयोजन काय आहे, हे हळूहळू कळून येते.
- सलीम मुल्ला, साहित्य अकादमीचे पुरस्कार विजेते