दुरावलेली वाघाटीची पिल्ली अखेर आईच्या कुशीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 10:24 AM2020-12-04T10:24:51+5:302020-12-04T10:27:28+5:30
कसबा बावडा येथील उसाच्या शेतात आईपासून दुरावलेली दुर्मीळ वाघाटीची (वाईल्ड रस्टी स्पॉटेड कॅट) दोन पिल्ली अखेर आईच्या कुशीत विसावली. त्याच्या आईसोबत पुनर्भेटीचा वनविभागाचा प्रयोग यशस्वी झाला
संदीप आडनाईक
कोल्हापूर : कसबा बावडा येथील उसाच्या शेतात आईपासून दुरावलेली दुर्मीळ वाघाटीची (वाईल्ड रस्टी स्पॉटेड कॅट) दोन पिल्ली अखेर आईच्या कुशीत विसावली. त्याच्या आईसोबत पुनर्भेटीचा वनविभागाचा प्रयोग यशस्वी झाला असला, तरी बघ्यांच्या गर्दीमुळे पहिल्या दिवशी दुसऱ्या पिलाची मात्र त्याच्या आईशी भेट झाली नव्हती. यासाठी वनविभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी संतोष वाळवेकर यांनी खूप प्रयत्न केले. आईसोबतचा हा मायेच्या पुनर्भेटीचा सोहळा वनविभागाच्या कॅमेऱ्यात बंद झाला आहे.
कसबा बावडा येथील रमेश पाटील यांच्या उसाच्या शेतात ३० नोव्हेंबर रोजी आढळलेली वाघाटीची ही दोन पिल्ली बिबट्याची असल्याच्या अफवेमुळे काही उत्साही नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली. यामुळे त्यांची आई या पिल्लांजवळ आली नाही. ही पिल्ली बिथरून जाऊ नयेत म्हणून बावडा रेस्क्यू फोरमच्या स्वयंसेवकांनी या पिलांना तातडीने वनविभागाच्या नियंत्रण कक्षाकडे सुपूर्द केले.
वन्यजीव संक्रमण व उपचार केंद्राचे स्वयंसेवक ऋषिकेश मेस्त्री, अमित कुंभार, समर्थ हराळे, अनिल ढोले, सानिका सावंत, वंशिका कांबळे, अवधूत कुलकर्णी यांच्यासोबत वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटी, बावडा रेस्क्यू फोरमचे स्वयंसेवक, कोल्हापूर वनविभागाचे उपवनसंरक्षक रावसाहेब काळे, करवीरचे वनक्षेत्रपाल सुधीर सोनावणे, फिरत्या पथकाचे वनक्षेत्रपाल युवराज पाटील, वनपाल विजय पाटील, वनरक्षक रुकेज मुल्लाणी गेले दोन दिवस या परिसरात ठिय्या मांडून होते.
वाघाटीच्या या दोन पिलांचे अंदाजे वय १३ ते १७ दिवस असून, मादी पिलाने नुकतेच डोळे उघडले होते; तर नर पिलाचे डोळे अद्यापही उघडलेले नव्हते. डॉ. विद्या पाटील यांनी भेट दिलेल्या इन्टेसिव्ह केअर वॉर्मरद्वारे डॉ. वाळवेकर यांनी या दोन्ही पिलांना आईची कृत्रिम ऊब दिली.
आईच्या दुधावर अवलंबून असणाऱ्या या पिलांची लवकरात लवकर आईसोबत पुनर्भेट व्हावी म्हणून वरिष्ठ वन अधिकाऱ्यांंशी चर्चा केली. त्यानुसार त्याच दिवशी सायंकाळी त्याच ठिकाणी पुनर्भेटीसाठी या दोन्ही पिलांना सुरक्षितरीत्या ठेवले. ही प्रक्रिया नोंद करण्यासाठी कॅमेरा ट्रॅप लावल्याची माहिती डॉ. संतोष वाळवेकर यांनी दिली आहे.
पिलांच्या हाकेला आईचा प्रतिसाद
एका पिलाने आईला आवाज देणे सुरू केले; परंतु दिवसभरातील गर्दीमुळे घाबरलेल्या वाघाटीने पिलांना प्रतिसाद दिला नव्हता. दोन ते तीन वेळा जागा बदलल्यानंतर १ डिसेंबर २०२० रोजी पहाटे ०५.४९ वाजण्याच्या सुमारास पिलांच्या हाकेला प्रतिसाद देत दबकत-दबकत येऊन मादी पिलास आई घेऊन गेली. मात्र, घाबरल्यामुळे ती दुसऱ्या पिलास घेऊन गेली नाही. मात्र २ डिसेंबरच्या रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास या दुसऱ्या पिलासही आईने सोबत नेले. आईसोबतच्या या मायेच्या पुनर्भेटीसाठी वनविभागाने केलेल्या प्रयत्नाचे कौतुक होत आहे.