जिल्ह्यातील साखर कारखाने ‘एफआरपी’पासून दूरच

By admin | Published: January 4, 2015 11:17 PM2015-01-04T23:17:02+5:302015-01-05T00:38:09+5:30

इतरांकडे लक्ष : किसन वीर, प्रतापगडने फोडली ऊसदराची कोंडी

Far from the sugar factories 'FRP' in the district | जिल्ह्यातील साखर कारखाने ‘एफआरपी’पासून दूरच

जिल्ह्यातील साखर कारखाने ‘एफआरपी’पासून दूरच

Next

वाठारस्टेशन : केंद्र शासनाने यावर्षीचा गळित हंगामासाठी निश्चित केलेली ‘एफआरपी’ चौदा दिवसांत ऊस उत्पादकांना देणे कारखानदारांसाठी बंधनकारक केले आहे. जिल्ह्यात दोन महिन्यांपासून गाळप उसाला अद्याप उचलही न देणाऱ्या कारखान्यांवर साखर आयुक्तांनी कारवाई सुरू केली आहे. किसन वीर, प्रतापगड या दोन कारखान्यांनी २,११२ रुपयांप्रमाणे ‘एफआरपी’ देण्याचे काम करत जिल्ह्यात ऊसदराची कोंडी फोडण्याचे काम केले आहे. इतर कारखाने कोणती भूमिका घेतात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
यावर्षी जिल्ह्यातील गतवर्षीच्या गाळपाचा सरासरी साखर उताऱ्यानुसार सर्वाधिक एफआरपी २,३९३ रुपये जयवंत शुगर या कारखान्याची निघाली आहे. त्यांनी यापैकी १,९०० रुपये एफआरपी पोटी उचल दिली आहे. त्यामुळे अजून किमान ४९३ रुपये कारखान्याला १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहे.
जिल्ह्यातील सर्वात कमी एफआरपीही नव्याने सुरू झालेल्या ग्रीन पॉवर शुगर वर्क्स गोपूज या कारखान्याची १,९७८ एवढी आहे. या कारखान्यानेही केवळ १,८०० रुपयांची उचल जाहीर केली. त्यामुळे उर्वरित १७८ रुपये प्रतिटन रक्कम या कारखान्याला शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहे. या दोन्ही कारखान्यांप्रमाणेच जिल्ह्यातील इतर कारखान्यांची याच दरम्यान एफआरपी रक्कम निघत आहे. तर जिल्ह्यातील न्यू फलटण शुगर वर्क्स साखरवाडी व फलटण येथील श्रीराम या दोन कारखान्यांनी अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केली नसल्याची माहिती मिळत आहे.
या गाळप हंगामात आतापर्यंत वीस लाख क्विंटल साखरनिर्मिती जिल्ह्यातील कारखान्यातून झाली आहे. राज्य शासनाकडून मिळणाऱ्या सध्याच्या साखर दराच्या ८५ टक्के रकमेतून इतर खर्च वजा करता कारखान्यांच्या हातात एक क्विंटल पोत्यापोटी केवळ १,४०५ रुपये राहत आहेत. त्यामुळे एफआरपीसाठी कारखान्यांनाही मोठी कसरत करावी लागणार आहे.
जिल्ह्यात पहिल्यांदा एफआरपी जाहीर करून किसन वीर, प्रतापगड या कारखान्यांनी ऊसदराची कोंडी फोडली असली तरी इतर कारखान्यांच्या भूमिका अजूनही गुलदस्त्यातच आहे. (वार्ताहर)

जिल्ह्यातील साखर कारखान्यांची एफआरपी

नावएफआरपी रक्कमदिलेली उचलदेय रक्कम
अजिंक्यतारा, सातारा२३४५१८००५४५
लोकमान्य बाळासाहेब देसाई, पाटण २२९६१७००५९६
किसन वीर, भुर्इंज२११२२११२-
प्रतापगड२१०९२११२३ रुपये (जादा दिले)
जरंडेश्वर२३२६१८००५२६
कृष्णा२२७७१९००३७७
सह्याद्री२२९९१९००३९९
जयवंत शुगर२३९३१९००४९३
ग्रीन पॉवर१९७८१८००१७८
न्यू फलटण, साखरवाडी२१४९??
श्रीराम फलटण२२०७??

चौदा दिवसांत गाळप उसाला एफआरपी रक्कमही एकरकमी देण्याचा नियम आहे. परंतु, जर संबंधित कारखान्याने संचालक मंडळांने ठराव देऊन एफआरपी रकमेची उचल जाहीर करुन उर्वरित फरक पंधरा टक्के व्याजाने देण्याचे मान्य केले तर हे कारखाने कारवाईपासून वाचू शकतात.
- पांडुरंग साठे, साखर संचालक, साखर संकुल पुणे

Web Title: Far from the sugar factories 'FRP' in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.