फराकटेवाडीने मूळ पुरुषाच्या स्मृती जपल्या
By admin | Published: May 17, 2017 11:18 PM2017-05-17T23:18:42+5:302017-05-17T23:18:42+5:30
शिवकालीन थडगे : चांदोबा माने सांस्कृतिक हॉलचा आज लोकार्पण सोहळा
रमेश वारके । -लोकमत न्यूज नेटवर्क
बोरवडे : फराकटेवाडीचा मूळ पुरुष चांदोबा माने याने ३६० वर्षांपूर्वी फराकटेवाडी हे गाव वसविले. त्या चांदोबा माने यांच्या शिवकालीन स्मारकाची स्मृती जपण्यासाठी आमदार हसन मुश्रीफ यांच्या फंडातून व लोकवर्गणीतून उभारलेल्या चांदोबा माने सांस्कृतिक हॉलचा लोकार्पण सोहळा आज, गुरुवारी संपन्न होत आहे. चांदोबा लिंबाजी माने यांनी १६५६ मध्ये हे गाव वसविल्याच्या नोंदी आहेत. चांदोबा यांच्या सहा मुलांनी बांधलेल्या थडग्याच्या माध्यमातून स्मृती जपण्यासाठी ग्रामस्थ सरसावले आहेत.
फराकटेवाडी (ता. कागल) हे जवळपास एक हजार लोकवस्तीचे छोटस गाव. इथे फक्त फराकटे आडनावाचीच कुटुंबे आहेत. पण, ‘फराकटे’ हे आडनाव कसे प्रचलित झाले आणि ही फराकटेवाडी कोणी वसविली याचा इतिहास ग्रामस्थ पूर्वापार सांगत आहेत. ग्रामस्थ सण, उत्सव, लग्न यावेळी प्रथम चांदोबा माने यांच्या थडग्याची पूजा करतात. काही वर्षांपूर्वी या शिवकालीन थडग्याचा इतिहास गावातील काही जाणकार लोकांनी जाणण्याचा प्रयत्न केला आणि या साडेतीनशे वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांना उजाळा मिळाला.
ऐतिसासिक घटनांचा माग काढताना ग्रामस्थांनी रायबाग (कर्नाटक ) येथील हेळव्यांकडील नोंदी मिळविल्या आहेत. त्यातील माहितीनुसार १६५६ मध्ये म्हसवड (जि. सातारा) येथून चांदोबा माने हे मानाजी, सिद्धोजी, उमाजी, सूर्याजी, बहेरजी, आप्पाजी या सहा मुलांसह सध्याच्या ठिकाणी स्थलांतरित झाले. येथे वाडा बांधून ते राहिले. काळाच्या ओघात हा वाडा नामशेष झाला असला तरी त्याच्या स्मृती ग्रामस्थांच्या मनात वंशपरंपरागत आठवणीनुसार कायम आहेत.
फराकटे आडनावाची माहितीही रंजक आहे. चांदोबा माने हा बोरवडेतील लोकांना अपरिचित होता. कोणाशीही त्याची ओळख नव्हती. बोरवडे व दूधगंगा नदीचा परिसर अशा हद्दीची सनद मिळवून तसा ताम्रपट त्याने तयार करून घेतला होता. परंतु, कालांतराने चांदोबा हा म्हसवडमधून काही कारणांमुळे फरार होऊन येथे राहिला असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे लोक त्याला चांदोबा माने ऐवजी उपरोधिकपणे फरार चांदोबा म्हणू लागले. या फरार शब्दातूनच अपभ्रंश होऊन फराकटे शब्द प्रचलित झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. काळाच्या ओघात चांदोबा माने ऐवजी चांदोबा फराकटे असेही त्यांचे नामकरण झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. शिखर शिंगणापूर हे त्यांचे धार्मिक श्रद्धास्थान होते. त्यामुळे सध्या गावात असणारे कुलदैवत महादेव मंदिराची स्थापनाही त्यानेच केल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे फराकटेवाडी हे शिवकालीन गावच्या निर्मितीची साक्ष देत आहे.