डोंगरकपारीतलं फराळे, शिक्षणात निराळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:43 AM2019-12-16T00:43:04+5:302019-12-16T00:43:46+5:30
डॉ. प्रकाश मुंज । कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या विद्यामंदिर, फराळे शाळेला नुकतीच १०० वर्षे पूर्ण झाली. राजर्षी ...
डॉ. प्रकाश मुंज ।
कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या विद्यामंदिर, फराळे शाळेला नुकतीच १०० वर्षे पूर्ण झाली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीतून १९१९ साली हातावर मोजण्याइतक्या पटसंख्येने सुरू झालेल्या शाळेची प्रगती देदीप्यमान अशी ठरली आहे.
लोकसहभागातून डिजिटल क्लासरूम, आनंददायी वर्ग, बोलके वर्ग, संगणक कक्ष, सभागृह व सुंदर व्हरांडा, आदी भौतिक सुविधांसह विज्ञान प्रदर्शनी, क्रीडा महोत्सव, सांस्कृतिक स्पर्धा, शिष्यवृत्ती, आदी विविध गुणवत्तांमध्येही शाळेने जिल्हास्तरावर नावलौकिक प्राप्त केला आहे. तसेच स्पर्धा परीक्षांची उत्तम तयारी, वाद्यवृंदमध्येही विद्यार्थ्यांनी आपली चमक दाखविली आहे.
विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटीच्या जोरावर आपले अस्तित्व सिद्ध केलेच, याचबरोबर त्या त्याकाळी लाभलेल्या शिक्षकांनीही नि:स्वार्थपणे ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता शाळेत हजेरी लावत ज्ञानदानाचे पवित्र काम केले आहे. याचीच कृतज्ञता म्हणून शतक महोत्सवी वर्षी ३४ माजी शिक्षकांचा कृतज्ञता सोहळा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह तालुक्यातील सर्वच जनप्रतिनिधी, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. तसेच सर्वच मान्यवरांनी सढळ हाताने शाळेला मदत केली. ही मदत सहा लाखांपर्यंत पोहोचली. यातून शाळेचा पूर्ण कायापालट केला आहे. शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थांच्या सहभागातून शाळा डिजिटल बनली आहे. भविष्यात जिल्हाच नव्हे, तर राज्यासाठी ही शाळा आदर्श ठरेल.
शाळेची वैशिष्ट्ये
बोलक्या भिंती, आनंददायी फलक, सामुदायिक कवायती, योगासने, संगीत परिपाठ अशासारखे उपक्रम प्रेरणा देतात.
शाळेत मुला-मुलींसाठी स्वच्छतागृह आहे.
शाळेच्या बाह्यांगाबरोबर अंतरंगही चांगले हवे, तरच मुलं रमतात. म्हणून शाळेची रंगरंगोटी केली आहे.
विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रत्येक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतात. अगदी धीट, आत्मविश्वासाने बोलणारी मुलं ही आता खेडवळ, लाजरीबुजरी, गोंधळलेली वाटत नाहीत.
१०० टक्के पटनोंदणी, परिसर भेटी, वनभोजन, शैक्षणिक सहली, लेझीम, कवायत, वाचन उपक्रम, विद्यार्थी गुणगौरव उपक्रम राबविले जातात.
माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीचा शैक्षणिक गुणवत्ता उंचविण्यात मोलाचा वाटा आहे.
शिक्षक वेळकाळाचे बंधन न पाळता चाकोरीबाहेर जाऊन शाळेसाठी शक्य तेवढे प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते.
राजर्षी शाहूंच्या पदस्पर्शाने पुनीत
राजर्षी छत्रपती शाहू महाराज ज्या-ज्यावेळी शिकारीसाठी राधानगरीला येत असत, त्यावेळी ते डोंगराईच्या कुशीत लपलेल्या या गावात फराळ करण्यासाठी काही वेळ थांबत असत. यामुळे या गावाला फराळे असे नाव पडल्याची आख्यायिका आहे. त्याकाळी महाराजांच्या दूरदृष्टीतून फराळेत सन १९१९ रोजी पाटलांच्या शेतात शाळा सुरू झाली. फराळे पंचक्रोशीतील काळम्मावाडी, लिंगाचीवाडी, डवरवाडी, धनगरवाडा येथील मुले या शाळेत हलाखीच्या परिस्थितीत शिकली. ना कुणाच्या पायात चप्पल, ना छत्री, ना दप्तर. तरीही शिकण्याची जिद्द, चिकाटी ठेवल्यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांनी आज शिक्षक, अधिकारी, वकील, इंजिनिअर, डॉक्टर, विविध सेवा सोसायटी, खासगी संस्थांमध्ये मोठ्या अधिकारी पदापर्यंत मजल मारली आहे. पुणे, मुंबईतील मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये हे विद्यार्थी कार्यरत आहेत. यासाठी अनेक शिक्षकांनी तुटपुंज्या पगारावर नि:स्वार्थीपणाने विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचे काम केले आहे. सर्वांचे सांघिक योगदान चांगले असून, सर्व शिक्षक उत्साही व कामसू आहेत. त्यामुळे खासगी शाळांना ही शाळा एक आव्हान असणार आहे.
अत्याधुनिक सुविधा
डिजिटल क्लासरूम, सर्व वर्गात एलईडी, संगणक कक्ष, प्रशस्त सभागृह व व्यासपीठ, वाद्यवृंद, गं्रथालय, प्रयोगशाळा, स्वच्छतागृह, प्रांगणात पेव्हीन ब्लॉक, हँडवॉश स्टेशन, आकर्षक प्रवेशद्वार, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय.
या शाळेतून अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर पोहोचले; पण यापेक्षा माणुसकीची नाती जपणारी माणसे तयार करता आली, हे आमचे मोठे भाग्य.
- अनंत पाटील, शिक्षक
या साधकांनी उजळले मंदिर
शाळेतील वर्तमान शिक्षक : जयश्री माळकर (मुख्याध्यापिका), संजय जांगनुरे, बी. एस. पाटील, सुरेश सुतार, शिवाजी गावडे. माजी शिक्षक : शंकर पाटील, अनंत पाटील, ए. आर. सुतार, संजय अण्णा पाटील, संजय सदाशिव पाटील. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी : समृद्धी पाटील, वैष्णवी पाटील, सौरभ पार्टे, सोनाली पाटील.
ग्रामस्थांचे योगदान : श्रीपती पाटील, बाळासाहेब पाटील, वाय. एम. सुतार, पांडुरंग पाटील, बाबूराव सुतार, सुरेश पाटील, आनंदा पाटील, संजय पाटील, जयवंत पाटील, शांताराम पाटील, लक्ष्मण गिरी, विलास डवर, तुकाराम सावंत, हिंदुराव पाटील, सीताराम देसाई, प्रकाश पाटील, गणेश पाटील, अशोक पाटील, बंडोपंत पाटील, अरविंद हवलदार, सुभाष पाटील, तानाजी ढोकरे, साधना पाटील, मच्छिंद्र गिरी, अनिल पाटील, आदी.