चेन्नईतील फरार लँडमाफियास कोल्हापुरात अटक, तिघा ग्राहकांना ५० कोटींचा गंडा : गांधीनगर-गोकुळ शिरगाव पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 06:52 PM2018-01-01T18:52:41+5:302018-01-01T18:58:26+5:30
जमीन-खरेदी विक्री व्यवसायामध्ये एक जमीन तिघांना लेखी कराराद्वारे विक्री करतो असे सांगून ५० कोटी रुपये घेऊन पसार झालेल्या चेन्नईतील लँडमाफियाच्या गांधीनगर व गोकुळ शिरगाव पोलिसांनी रविवारी मुसक्या आवळल्या. संशयित एस. व्यंकटरामन श्रीरंगराजन (वय ५७, ए. कामराज, चेन्नई) असे त्याचे नाव आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो चेन्नईतून फरार होता.
कोल्हापूर : जमीन-खरेदी विक्री व्यवसायामध्ये एक जमीन तिघांना लेखी कराराद्वारे विक्री करतो असे सांगून ५० कोटी रुपये घेऊन पसार झालेल्या चेन्नईतील लँडमाफियाच्या गांधीनगर व गोकुळ शिरगाव पोलिसांनी रविवारी मुसक्या आवळल्या. संशयित एस. व्यंकटरामन श्रीरंगराजन (वय ५७, ए. कामराज, चेन्नई) असे त्याचे नाव आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो चेन्नईतून फरार होता.
संशयित एस. व्यंकटरामन श्रीरंगराजन
अधिक माहिती अशी, संशयित एस. व्यंकटरामन श्रीरंगराजन याने २०१५ मध्ये चेन्नई येथील लोकांना जमीन विकत देतो असे आमिष दाखवून तिघा ग्राहकांकडून जमिनीसंबंधी लेखी करार करून पैसे उचलले. त्यानंतर ही जमीन दुसऱ्याच व्यक्तीला विकून तो सुमारे ५० कोटी रुपये घेऊन पसार झाला.
गेल्या दोन वर्षांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. त्याचे मोबाईल लोकेशन तपासल्यानंतर गोकुळ शिरगाव येथील पंचतारांकित एमआयडीसी परिसर निघाले. त्यानुसार चेन्नई क्राईम ब्रँचचे मुथुवेल पांडे, पोलीस निरीक्षक आनंद बाबू, उपनिरीक्षक कमल मोहन, कॉ. संदीप कुमार, लोकेश वरण, आदी पाचजणांचे पथक कोल्हापुरात आले.
त्यांनी पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांची भेट घेऊन आरोपीला पकडण्यासंबंधी मदत मागितली. त्यांनी गांधीनगरचे सहायक पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे युवराज खाडे यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार तीन दिवस सापळा रचून संशयित श्रीरंगराजन याच्या पंचतारांकित एमआयडीसीमधील सिल्व्हर झोन परिसरातून मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्याला चेन्नई पोलीस घेऊन गेले.