शिरोळ तालुक्यात बाप्पाला भक्तिभावाने निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:29 AM2021-09-15T04:29:50+5:302021-09-15T04:29:50+5:30
जयसिंगपूर, शिरोळ नगरपालिकेने मूर्तिदान करण्यासाठी कुंडांची व्यवस्था केली होती. पोलीस प्रशासनाच्या मदतीने मूर्तिदान उपक्रम राबविला. या उपक्रमाला भाविकांनीदेखील चांगला ...
जयसिंगपूर, शिरोळ नगरपालिकेने मूर्तिदान करण्यासाठी कुंडांची व्यवस्था केली होती. पोलीस प्रशासनाच्या मदतीने मूर्तिदान उपक्रम राबविला. या उपक्रमाला भाविकांनीदेखील चांगला प्रतिसाद दिला. कोरोना काळात यंदा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा केला. गणपती बाप्पांचे विसर्जनही सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावून, कोणतीही गर्दी न करता केले. शिरोळ येथील पंचगंगा नदीघाटावर दत्त कारखान्याच्यावतीने तर गणेश मंदिरजवळ कृत्रिम कुंडांची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी अनेकांनी या कुंडामध्येच गणपती, गौरीचे विसर्जन केले.
नृसिंहवाडी येथील राम मंदिराशेजारी व अन्नछत्र परिसरात गौरी व गणपती विसर्जनासाठी सोय करण्यात आली होती. दत्त देव संस्थानच्यावतीने निर्माल्य विसर्जनासाठी ट्रॅक्टर ट्रॉली तसेच निर्माल्य कुंडाची व्यवस्था केली होती. नदीला पाणी जास्त असल्याने नदीकाठी कोणताही अपघात होऊ नये यासाठी सुरक्षारक्षक व पट्टीचे पोहणारे नदीकाठी तैनात करण्यात आले होते. यावेळी दत्त देव संस्थानचे अध्यक्ष मेघश्याम पुजारी व सचिव महादेव पुजारी उपस्थित होते. नावाडी अरुण गावडे व सहकारी यांनी आपल्या नावेतून विसर्जनासाठी आलेल्या गणपतींचे विसर्जन केले.
फोटो - १४०९२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - शिरोळ येथील पंचगंगा नदीघाटावर दत्त कारखान्याच्यावतीने कृत्रिम कुंडामध्ये भाविकांनी गणेशमूर्तींचे विसर्जन केले. (छाया : सुभाष गुरव, शिरोळ)