Kolhapur: सायकलवरुन सुरु झालेला 'फरहान'चा प्रवास पोहोचला 'आयएएस'पर्यंत
By पोपट केशव पवार | Published: April 17, 2024 04:23 PM2024-04-17T16:23:10+5:302024-04-17T16:23:35+5:30
शिष्यवृत्तीचा आधार
पोपट पवार
कोल्हापूर : घरची परिस्थिती बेताचीच, मात्र, त्याचा कधीच बाऊ न करता प्राथमिक शिक्षणापासून ते अभियंता होईपर्यंत सायकलनेच त्याच्या आयुष्याला गती दिली. सायकलवरून सुरू झालेला प्रवास त्याला थेट आयएएस अधिकाऱ्यापर्यंत घेऊन गेला. यूपीएससी परीक्षेत देशात १९१ वी रँक मिळाल्यानंतर आजी, आत्या, चुलते, वडील अनेकांच्या कौतुक वर्षावात चिंब भिजत असताना आईसह तो मात्र सायकलची आठवण काढून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात गुंग होता.
कोल्हापुरातील कदमवाडीच्या कारंडे मळा येथे राहणाऱ्या फरहान इरफान जमादार याची ही गोष्ट. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर फरहानवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. कष्टाळू असणाऱ्या फरहानचे अभिनंदन करण्यासाठी मंगळवारी सायंकाळी जमादार परिवारासह त्यांचा गोतावळा जमला. कदमवाडीतील सुसंस्कार विद्यालयातून प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवल्यानंतर फरहानने विवेकानंद कॉलेजमधून बारावीचे शिक्षण घेतले. पुढे सांगलीच्या वालचंद कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्सची पदवी घेतली. त्याच कॉलेजमधील दोन विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळविल्याने फरहानला गोडी लागली. 'व्हायचे तर आयएएस'च ही खूणगाठ मनाशी बांधत त्याने स्पर्धा परीक्षेचा संकल्प सोडला.
इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर २०२० मध्ये त्याने नोकरी न करता कोल्हापुरातील खासगी अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. घर ते अभ्यासिका अंतर जास्त होते. मात्र, रोज सकाळी सात वाजता सायकलवरून अभ्यासिका गाठायची ते थेट रात्री ११ वाजताच घरी परतायचे. हा संघर्षाचा दोन वर्षांचा दिनक्रम फरहानने कधी चुकविला नाही. यूपीएससीच्या २०२२ मध्ये मेन्समध्ये अपयश आले. मात्र, मित्र आणि कुटुंबाने कमालीचा धीर दिल्यानेच यातून सावरत पुन्हा तयारी सुरू केल्याचे फरहान सांगतो. पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला तरी हिम्मत हरलो नाही. पुढे दिल्लीत जाऊन या परीक्षेची तयारी केली. रोज १२-१२ तास अभ्यास हेच ध्येय ठेवत ते अंमलात आणल्यानेच यशाला गवसणी घालू शकल्याचे प्रांजळ भावनाही त्याने मांडली.
शिष्यवृत्तीचा आधार
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना इरफानला शिष्यवृत्ती मिळाली. त्यामुळे कुटुंबावर तितकासा आर्थिक ताण आला नाही. कोल्हापुरातील प्री आयएएस ट्रेनिंग सेंटरच्या प्रमुख लता देवाप्पा जाधव यांच्यासह अनेकांचे सहकार्य मिळाल्याचे त्याने आवर्जून सांगितले.
आजी, आईला अभिमान
जमादार कुटुंब हे सुशिक्षित आहे. वडील इरफान यांचा प्रिंटिंगचा व्यवसाय तर आई गृहिणी. पोराने अभूतपूर्व यश मिळवल्याने आई-वडिलांसह आजी मुमताजलाही 'काय कररू नी काय नको' असे झाले होते.
रोज बारा बारा तास अभ्यास केला. अपयश आले म्हणून थांबलो नाही, हिम्मत हरलो नाही. त्यामुळेच हे यश मिळवू शकलो. -फरहान जमादार,