गव्याच्या हल्ल्यात राधानगरीत शेतमजूर गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2022 01:10 PM2022-01-04T13:10:53+5:302022-01-04T13:13:43+5:30
वारंवार होत असलेल्या गव्याच्या हल्लाने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. तरी वन विभागाने गव्याच्या बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
सरवडे: राधानगरी येथे नदीकाठी जवळील छत्रपती शाहू महाराज यांच्या शेरी नावाच्या शेतात वानरांना हुसकावून लावत असताना अचानकपणे पाठीमागून आलेल्या गव्याने शेतमजूरावर हल्ला केला. या हल्ल्यात शेतमजूर गंभीर जखमी झाला. संतोष रामचंद्र चांदम (वय ४४ ) असे या जखमी शेतमजूराचे नाव आहे.
चांदम यांच्या पाठीला व पायाला दुखापत झाली आहे, शेतात असणाऱ्या लोकांनी गव्याला हुसकावून लावले. संतोष यास ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तातडीने वन विभागाचे कर्मचारी दाखल झाले आहेत, जखमींची विचारपूस करून नुकसानभरपाई देण्यात येईल असे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे.
चांदम याच्यावर प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले आहे. वारंवार होत असलेल्या गव्याच्या हल्लाने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. तरी वन विभागाने गव्याच्या बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.