कोल्हापूर: एस.टी. बसखाली सापडून शेतकरी ठार, ऐन सणासुदीत दिंडोर्ले कुटुंबियांवर कोसळला दु:खाचा डोंगर
By तानाजी पोवार | Published: August 30, 2022 05:46 PM2022-08-30T17:46:32+5:302022-08-30T17:47:01+5:30
बसमध्ये चढत असतानाच बस अचानक सुरु होऊन पुढे गेली, त्यामुळे धक्का बसून दिंडोर्ले खाली रस्त्यावर पडले. दरम्यान बसचे मागील चाक त्यांच्या अंगावरुन गेल्याने ते जागीच ठार झाले.
कोल्हापूर : एस.टी. बसच्या मागील चाकाखाली सापडून नंदगाव (ता. करवीर) येथील शेतकरी जागीच ठार झाला. शिवाजी शंकर दिंडोर्ले (वय ६६ रा. नंदगाव, ता. करवीर) असे त्यांचे नाव आहे. ही दुर्घटना आज, मंगळवारी दुपारी संभाजीनगर एस.टी. आगारात घडली. या दुर्दैवी घटनेमुळे ऐन सणासुदीत दिंडोर्ले कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
घटनास्थळी व पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिवाजी दिंडोर्ले हे कुशल शेतकरी असून घरगुती कामानिमीत्त मंगळवारी सकाळी कोल्हापूरात आले होते. दुपारी नंदगावला जाण्यासाठी शाहू मैदान येथे एस.टी. बसमध्ये बसले. पुढे बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांसह बस ही चालकाने संभाजीनगर आगारात नेली. त्यानंतर त्या बसमधील प्रवाशांना दुसर्या बसमध्ये बसण्याचे आवाहन केले.
नंदगावकडे जाणारी दुसरी बस फलाटवर उभी होती, त्यात प्रवासी चढत होते. शिवाजी दिंडोर्ले हेही बसमध्ये चढत होते. त्यावेळी बस सुरु होऊन पुढे गेली, त्यामुळे धक्का बसून बसमध्ये चढणारे शिवाजी दिंडोर्ले हे दरवाजातून खाली रस्त्यावर पडले, काही समजण्यापूर्वीच बसचे मागील चाक त्यांच्या अंगावरुन गेल्याने ते जागीच ठार झाले.
दुर्घटनेनंतर गोंधळ उडाल्याने आगारातील प्रवासी व एस.टी. कर्मचारी घटनास्थळी धावले. दिंडोर्ले यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सुन, दोन विवाहीत मुली असा परिवार आहे. दुर्घटनेनंतर दिंडोर्ले यांचे नातेवाईक संतप्त झाले, त्यांनी बस चालकाच्या चुकीमुळे हा अपघात घडल्याचा आरोप केला. या दुर्घटनेबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात एस,टी. बसचालक साताप्पा पाटील यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.