Kolhapur News: हुसकावताना गवा बिथरला, हल्ल्यात शेतकऱ्याचा हकनाक बळी गेला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 12:41 PM2023-03-27T12:41:11+5:302023-03-27T12:52:12+5:30

गर्दीला पांगविताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना आले नाकीनऊ

Farmer death in gaur attack in panhala kolhapur district | Kolhapur News: हुसकावताना गवा बिथरला, हल्ल्यात शेतकऱ्याचा हकनाक बळी गेला

Kolhapur News: हुसकावताना गवा बिथरला, हल्ल्यात शेतकऱ्याचा हकनाक बळी गेला

googlenewsNext

पोर्ले तर्फ ठाणे : वैरण आणण्यासाठी जात असताना बिथरलेल्या गव्याच्या हल्ल्यात कसबा ठाणे (ता. पन्हाळा) येथील शेतकऱ्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. माजी उपसरपंच माणिक बळवंत पाटील (वय ५२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

माजगाव परिसरातील तरुणांनी गोंधळ करून गव्याला कसबा ठाण्याच्या डोंगरात हुसकावून लावले होते. बिथरलेल्या गव्याने समोरून येणाऱ्या माणिक पाटील यांच्यावर हल्ला केल्याने शेतकऱ्याचा हाकनाक बळी गेला असल्याची चर्चा घटनास्थळी होती. शेतकऱ्यावर हल्ला करून मक्याच्या शेतात बसलेल्या गव्याला बघायला लोकांनी गर्दी केली होती. गर्दीला पांगविताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना नाकीनऊ आले.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,वाघजाई डोंगरावरील कळपातून चुकलेला गवा सातार्डे, पडळ मार्गे रविवारी (दि.२६) सकाळी माजगावाच्या शिवारात दिसला. गव्याला हुसकावून लावण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. डोंगराच्या दिशेने हुसकावण्यासाठी लोकांनी आरडाओरड करत गोंधळ घातला तसेच दगड आणि काठ्या फेकून मारल्या त्यामुळे गवा बिथरला असल्याचे वनपाल नाथा पाटील यांनी सांगितले.

दुपारी गव्याला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सतर्कतेने कसबा ठाण्याच्या डोंगराच्या दिशेने घालविले. त्यानंतर डोंगर उतरून गवा कसबा ठाणे गावाच्या शिवारात गेला. दरम्यान माणिक पाटील पायवाटेने वैरण आणण्यासाठी जात असताना बिथरलेला गव्याने त्यांच्यावर समोरून हल्ला केला. त्यांना धडक देऊन पोटात शिंग खूपसून जखमी केले. आशिष पाटील आणि सुहास पाटील यांनी जखमी अवस्थेत त्यांना बाहेर आणले माणिक पाटील यांचा उपचारापूर्वीच वाटेत मृत्यू झाला.

हकनाक बळी

गवे शिवारात किंवा लोकवस्तीत आले की, त्यांना पाहण्यासाठी किंवा हुसकावण्यासाठी लोक गर्दी करतात. वर्षापूर्वी हुसकावताना भुयेवाडी येथील तरुणाचा गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता, तर भुदरगड तालुक्यात शेतकऱ्याचा गव्याच्या धडकेत मृत्यू झाला होता. याचा बोध नसलेल्या माजगाव परिसरातील युवकांनी गव्याच्या पाठी लागून गोंधळ केला आणि त्याला बिथरवले. गव्याचे चित्रीकरण करण्यासाठी अनेक युवकांनी त्याच्यामागे जाण्याचा धाडसी प्रयोग केला. सोशल मीडियावर फोटो किंवा चित्रीकरण लवकर टाकण्याची हौस जीवावर बेतण्याची भीती तरुणांत दिसत नव्हती. वनविभागाचे अधिकारी लोकांना समजवून सांगत असताना, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले; परंतु माजगावात केलेल्या गोंधळाने कसबा ठाण्यातील शेतकऱ्याचा हकनाक बळी गेला.

पोर्लेत गव्यांचा कळप आढळला

पोर्ले तर्फ ठाणे येथील साळोखे आणि काशिद शिवारात पाच गव्यांचा कळप अन्नाच्या शोधात आला होता. रात्री शिवारात पाणी पाजण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना गवे आढळले. सकाळी त्यांना मार्ग न सापडल्याने शिवारातील शेतकऱ्यांनी त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यातील तीन गवे डोंगराच्या दिशेने गेले, तर दोन गवे उसाच्या शेतात बसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

Web Title: Farmer death in gaur attack in panhala kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.