Kolhapur: पाला पेटवताना शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 13:46 IST2024-03-25T13:44:07+5:302024-03-25T13:46:15+5:30
कोपार्डे : साबळेवाडी (ता. करवीर) येथे उसाचा पाला पेटवताना आगीत सापडून शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाला. गुंडोपंत तातोबा पाटील (वय ...

Kolhapur: पाला पेटवताना शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू
कोपार्डे : साबळेवाडी (ता. करवीर) येथे उसाचा पाला पेटवताना आगीत सापडून शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाला. गुंडोपंत तातोबा पाटील (वय ६५) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना सकाळी ११ वाजता घडली. घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, साबळेवाडीत गुंडोपंत यांची भोसले माळ या नावाच्या भागात शेती आहे. अलीकडेच त्यांच्या उसाची तोड झाली होती. शेताकडून पाला निखारून येतो, असे घरात सांगून ते सकाळी १० वाजता बाहेर पडले. त्यांनी ११ वाजता पाला पेटवला. पण, सध्या उन्हाच्या तडाखा सकाळी ८ वाजल्यापासूनच सुरू होतो. आग लावल्यानंतर आजूबाजूला शेतात कोणी नव्हते. आगीत गुंडोपंत अडकले असावेत अथवा त्यांच्या अंगावरील कपड्यांनी आगीच्या झळीत पेट घेतला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी घाबरलेल्या गुंडोपंत यांना आरडाओरडा करता आला नसावा. यामुळे आजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांना याची कल्पना आली नाही.
शेजारच्या शेतात एक महिला कामासाठी आली असता आगीत होरपळल्याने ९५ टक्के भाजल्याने गंभीर जखमी होऊन उसाच्या सरीत पडलेले गुंडोपंत तिला दिसले. ते पाहून या महिलेने आरडाओरडा केला. यावेळी आजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांनी धाव घेतली. जखमी अवस्थेत गुंडोपंत यांना कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सीपीआर चौकात घटनेची नोंद झाली आहे. गुंडोपंत यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.